spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्याध्यापक, प्राचार्यांनी केला ७५ टक्के मतदानाचा प्रण

– मनपाच्या ‘कॅम्पस कनेक्ट’ कार्यक्रमात केला निश्चय

नागपूर :- येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, यासाठी नागपूर महानगरपालिकातर्फे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचार्य आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयकांसाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ कार्यक्रम वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात शनिवारी (ता. १०) घेण्यात आला. हा कार्यक्रम महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व मनपा अतिरिक्त आयुक्त वसूमना पंत यांच्या अध्यक्षतेत पार पडला.

सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करा, आपण सर्वांनी लोकशाहीचा वापर करीत मतदान केले तर ७५ टक्के मतदानाचा टक्का नक्कीच गाठू शकू, त्यामुळे सर्वांनी मतदान नक्की करा असे आवाहन यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त वसूमना पंत यांनी केले. याप्रसंगी स्वीप समन्वयक डॉ. सुशांत चिमणकर यांनी उपस्थितांना मतदान शपथ दिली. सर्वांनी मतदान शपथ घेत नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत ७५ टक्के पेक्षा जास्त मतदान करण्याचा निश्चय केला.

यावेळी मनपा उपायुक्त व स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे, नागपूर विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना, संचालक सोपानदेव पिसे, मनपा जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी पियूष अंबुलकर, स्वीप समन्वयक डॉ. सुशांत चिमणकर, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, मनपा व इतर शाळेचे शिक्षक तसेच एनएसएस आणि एनसीसी स्वयंसेवक, शिक्षण संबंधित संस्था प्रामुख्याने उपस्थित होत्या.

१५ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाही दिनांक ठरली आणि तेव्हापासून मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे याकरिता आम्ही प्रयत्न सुरु केले. नागरिकांच्या सोयीसाठी आमच्या मनपाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मतदान जागृतीचे विविध व्हिडिओ प्रसारित केले आहेत. तसेच चार उमेदवारांना यावेळी मतदान कसे करायचे आहे ही प्रक्रिया देखील व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार प्रसार केली आहे. यातून नागरिकांना प्रक्रिया समजण्यास मदत होईल व ते आपले कर्तव्य सुरळीतपणे पार पाडू शकतील असे, मनपा अतिरिक्त आयुक्त वसूमना पंत यांनी सांगितले. तसेच मतदान केंद्रावरील सोयी विषयी त्या बोलल्या. बूथ वर पिण्याच्या पाण्याची सोय, व्हीलचेअर व इतर सुविधा असतील. तसेच दिव्यांग व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी एनएसएस चे स्वयंसेवक व आशा सेविका देखील केंद्रांवर उपस्थित असतील. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करा. आपण सर्वांनी लोकशाहीचा वापर केला आणि मतदान केले तर ७५ टक्के मतदानाचा टक्का नक्कीच गाठू शकू, त्यामुळे सर्वांनी मतदान नक्की करा असे आवाहन यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त वसूमना पंत यांनी केले.

महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिकांची निवडणूक आहे आणि या सर्वांना मागे टाकून आपण ७५ टक्के मतदान करायचे आहे जेणे करून नागपूरत सर्वात जास्तीत मतदान होईल व नागपूर पहिल्या स्थानावर येईल. यात ‘कॅम्पस कनेक्ट’ कार्यक्रमाचे महत्त्व म्हणजे असे कि सर्व शिक्षकगणांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये मतदान जनजगृती करावी. युवा मतदार यांचा समाज घडविण्यात मोठा हात आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगून मतदानास प्रेरित करायचे आहे. मतदार केंद्र व बूथ जाणून घेण्यासाठी ‘मताधिकार अँप’ चा वापर करावा व विध्यार्थांमार्फत याची प्रचार प्रसिद्धी करण्याचे आवाहन मनपा उपायुक्त व स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी केले.

चांगला समाज घडविण्यात शिक्षकांचे नेहमीच मोठे योगदान आहे. प्रत्येक १८ वर्षावरील नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. आपल्या लोकशाहीचा वापर करून मतदानाचे महत्व प्रत्येक शिक्षकाने विध्यार्थांना सांगावे. मतदानाचे महत्त्व घरोघरी पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना देखील मतदानास प्रेरित करावे. दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्र पर्यंत पोहचण्यात विद्यार्थ्यांनी मदत करावी असे आवाहन स्वीप समन्वयक डॉ. सुशांत चिमणकर यांनी केले.

मतदानाचा टक्का वाढावा व या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता रॅली काढून किंवा इतर जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन एनएसएस स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षक व इतर सर्वजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. १८ वर्षांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच दिव्यांगांसह सर्वांना मतदान करायचे आहे. आपले शहर घडविण्यात मतदानामध्ये युवांचा मोठा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती करावी आणि सर्वांनी याकरिता प्रेरित करावे असे नागपूर विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना, संचालक सोपानदेव पिसे यांनी म्हटले. यावेळी मनपा जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व सर्वांना मतदानाचे महत्व सांगत १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.