हंसराज, प्रतिनिधी भंडारा गोबरवाही :- जिल्ह्यात अवैध खनिज साठवणूक आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध भंडारा पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत चिखला येथे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून विनापरवाना साठवून ठेवलेले १६७० किलो मॅग्नीज जप्त केले. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोबरवाही परिसरात गस्त घालत असताना, चिखला येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये मॅग्नीजची अवैध साठवणूक केली असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पाटील व त्यांच्या पथकाने सद्दाम शकिल शेख (वय ३४ वर्ष, रा. चिखला) याच्या घरावर छापा टाकला.
घराच्या अंगणाची झडती घेतली असता, तेथे ३४ पिवळ्या प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये काळा दगड (मॅग्नीज) आढळून आला. एकूण १,६७० किलो वजनाचा हा साठा असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ८३,५०० रुपये इतकी आहे. या साठवणुकीबाबत आरोपीकडे कोणताही परवाना किंवा कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या फिर्यादीवरून गोबरवाही पोलीस ठाण्यात आरोपी सद्दाम शेख याच्याविरुद्ध अपराध क्रमांक १४/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील व पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहेत.








