spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगरपंचायत बिडगाव तरोडी खुर्द पांढुर्णा येथे नव्या नेतृत्वाचा पदग्रहण सोहळा उत्साहात

कामठी :- नगरपंचायत बिडगाव तरोडी खुर्द पांढुर्णा येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष वीरू चंद्रमणी जामगडे व उपाध्यक्ष निकेश अरुण कातुरे यांच्या पदग्रहण समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती लाभली. तसेच टेकचंद सावरकर, माजी आमदार व इतर सन्माननीय पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक-नगरसेविकांचा  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, 1965 (MMC Act 1965) ची प्रत, शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेने सन्मान करण्यात आला. याच प्रसंगी आज निवड झालेल्या नामनिर्देशित सदस्य निहाल चिकटे व अजय बसेन यांचा इतर नगरसेवक-नगरसेविकांसह विशेष सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविकांना लोकाभिमुख, संवेदनशील व पारदर्शक कारभार करत जनतेचे खरे सेवक म्हणून कार्य करण्याचे स्पष्ट व ठाम निर्देश दिले. नगरपंचायत ही केवळ प्रशासकीय संस्था नसून जनतेच्या अपेक्षांचे केंद्र आहे, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

पदग्रहणानंतर नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी नगरपंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे, समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याधिकारी विनायक घुगे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा पदग्रहण सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Popular Articles