spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाडकी बहीण योजनेतील विलंबामुळे नागपूर नाक्यावर रस्ता रोको

– पोलीस निरीक्षक भुसारी यांनी घेतला पुढाकार, जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचे निर्देश

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने संतापलेल्या महिलांनी आज भंडारा येथील नागपूर नाक्यावर आक्रमक पवित्रा घेत ‘रस्ता रोको’ आंदोलन केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अखेर पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी मध्यस्थी करत पाच महिला प्रतिनिधींना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेले, जिथे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला तातडीने निर्देश देऊन महिलांच्या तक्रारीचे निराकरण केले.

शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र असूनही गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. याबाबत संबंधित कार्यालयात वारंवार चोकशी केली असता, तिथल्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. “इतर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, मात्र आम्हालाच का वगळण्यात आले?” असा सवाल या महिलांनी उपस्थित केला. कार्यालयातून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर संयम सुटलेल्या महिलांनी नागपूर नाक्यावर रस्त्यावर बसून रस्ता जाम केला.

आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त महिलांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली. केवळ रस्ता रिकामा करण्यावर भर न देता, भुसारी यांनी महिलांच्या समस्येचे गांभीर्य ओळखून पाच महिला प्रतिनिधींना स्वतःच्या गाडीत बसवले आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी महिलांची बाजू शांतपणे ऐकून घेतली. महिलांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “आम्ही पात्र असूनही आम्हाला डावलले जात आहे. कार्यालयात विचारणा केली तर नीट उत्तर मिळत नाही, उलट टाळाटाळ केली जाते. त्यामुळेच आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.”

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या महिलांच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आणि काय समश्या आहे त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर महिलांनी समाधान व्यक्त केले आणि आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनामुळे नागपूर-रायपूर महामार्गावरील नागपूर नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अर्धा तास रस्ता जाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या परिस्थिती शांत असून पात्र महिलांनी प्रशासनाकडे सकारात्मक आशेने पाहत असल्याचे सांगितले.

Popular Articles