नागपूर :- राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असून, कधी गारठा तर कधी दुपारचा उष्मा अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे.
दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे काही काळ ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही स्थिती निवळल्यानंतर आता किमान आणि कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रामुख्याने तापमानात २ ते ३ अंशांची घट अपेक्षित असून, त्यानंतर हळूहळू तापमान वाढण्याची शक्यता आहे. पावसाळी वातावरण ओसरल्यानंतर किमान तापमानात चढ-उतार सुरू झाले असून, आज शुक्रवारी राज्याच्या पाऱ्यात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत तापमान पुन्हा वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
दरम्यान, उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत असताना, हरियाणातील हिस्सार येथे सपाट भूभागावरील देशातील नीचांकी ०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याच कालावधीत केरळमधील कोट्टायम येथे २४ तासांत देशातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. महाराष्ट्रात मध्य भागातील सोलापूर येथे ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.
राज्यातील किमान तापमानाचा विचार करता, गुरुवारी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.४ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवण्यात आले, तर धुळे कृषी महाविद्यालयात किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस होते. विदर्भातील गोंदिया येथे पुन्हा एकदा ९ अंश सेल्सिअस इतकी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नागपूर येथे देखील तापमान ११ अंश सेल्सिअस च्या जवळपास आहे. विदर्भातील तापमानात देखील सातत्याने बदल होत आहे. दिवसा ऊन जाणवत असले तरीही सकाळी आणि सायंकाळी कडाक्याची थंडीही जाणवत आहे.
इतर भागांमध्ये किमान तापमानात किंचित वाढ झाल्याने पहाटेचा गारठा काहीसा कमी झाला असला, तरी दुपारच्या वेळेत उकाडा वाढल्याचे नागरिकांना जाणवत आहे.
आज, शुक्रवारी राज्यभर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज असून, त्यानंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या अचानक बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








