नागपूर :- राज्यात औरंगजेबाच्या कबरीबाबत झालेल्या वक्तव्यांनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा फटका नागपुरालाही बसला. पवित्र आयातचा अवमान झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याचे रूपांतर दंगलीत झाले. या दंगलीनंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत प्रमुख आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई केली. या कारवाईमुळे संबंधित कुटुंब रस्त्यावर आले; मात्र आता त्याच कुटुंबातील एक महिला थेट नगरसेवक बनल्याने नागपूर शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे.
नागपूरच्या महाल परिसरात मार्च २०२५ मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी फहीम खान यांचे नाव प्रमुख आरोपी म्हणून पुढे आले. या घटनेनंतर त्यांना चार महिन्यांसाठी कारागृहात डांबण्यात आले. त्याच काळात पहाटेच्या सुमारास पोलीस व महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत खान कुटुंबाचे दुमजली घर बुलडोझरने जमीनदोस्त केले. या कारवाईवर कायदेशीर प्रक्रिया, नैसर्गिक न्याय आणि मानवी दृष्टिकोनातून तीव्र चर्चा झाली होती.
या पार्श्वभूमीवर फहीम खान यांच्या पत्नी अलिशा खान यांनी नागपूर महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक तीनमधून त्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या. निवडणुकीच्या निकालात अलिशा खान यांनी ९४५५ मते मिळवत भाजपच्या भाग्यश्री कानतोडे यांचा सुमारे १९०० मतांनी पराभव केला. घर पाडण्याच्या कारवाईनंतर सहानुभूती, स्थानिक प्रश्न आणि प्रशासनाविरोधातील नाराजी यांचा या निकालात मोठा वाटा असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
प्रचारादरम्यान अलिशा खान यांनी केवळ दंगलप्रकरणापुरते मुद्दे मर्यादित न ठेवता प्रभागातील मूलभूत नागरी प्रश्नांवर भर दिला. “घर पाडण्याच्या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ कारवाई केली; मात्र आमच्या भागातील समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत,” असा आरोप त्यांनी केला. पिवळी नदीलगतच्या वस्त्यांमध्ये दर पावसाळ्यात पाणी साचते, जलनिस्सारणाची व्यवस्था अपुरी आहे, शासकीय शाळा जीर्णावस्थेत असून काही शाळा बंद पडल्या आहेत, तसेच झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण रखडले असल्याचे त्यांनी सांगितले.
आपत्कालीन वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्णांना आठ किलोमीटर अंतरावरील वैद्यकीय महाविद्यालयात न्यावे लागते आणि या विलंबामुळे अनेकांचे प्राण जातात, असा आरोपही त्यांनी केला. एमआयएमने नागपूर शहरात १७ उमेदवार उभे केले होते. त्यांचे सहा उमेदवार निवडून आले. अलिशा खान यांच्या विजयाने नागपूरच्या राजकारणात बुलडोझर कारवाईपासून सभागृहापर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.








