spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कळंब येथे खोदकामात सापडले शिवलिंग, नंदी; दहाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज, दर्शनासाठी भाविकांची गर्दी !

कळंब :- चिंतामणी मंदिरामुळे कळंबची राज्यभरात ओळख आहे. त्यात आता खोदकामात शिवलिंग, नंदीच्या मूर्ती सापडल्याने आणखी भर पडली आहे. खोदकामात सापडलेल्या मूर्ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज इतिहास तज्ज्ञांचा आहे.

पुरातन काळापासून कळंबनगरी आहे. ही नगरी श्री चिंतामणीच्या पदपावलांनी पावन झाली असून इंद्र देवाने येथे श्री चिंतामणीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे दाखले गणेश पुराणात आढळतात. या नगरीला १४ चावड्या, ३२ महाल व १२ मारुतीचे गाव म्हणून ओळखले जाते. या भागात अनेक पौराणिक मूर्ती सापडतात. स्थानिक रहिवासी राजेश सारडे यांच्या सारडेवाडी ले आउटच्या ओपन स्पेसमध्ये सावित्रीबाई फुले सभागृहाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. खोदकामादरम्यान काळ्या पाषाणात कोरीव काम केलेली शिवलिंग, नंदीची मूर्ती सापडली.

ही वार्ता कळताच भक्तांनी दर्शनासाठी येथे गर्दी केली. ३० वर्षांपूर्वी येथील पारवेकर नगरमध्ये विश्रामगृहाचे खोदकाम चालू असतानाच अतिशय सुंदर विष्णूची मूर्ती सापडली. ती मूर्ती पुरातत्त्व विभागाने पुणे येथे नेली आहे. वीस वर्षांपूर्वी दत्तापूर मार्गावरील टेकडीवर एका गुराख्याला काळ्याभोर पाषाणावर सुंदर नक्षीकाम केलेली विंध्यवासिनीची देवीची मूर्ती सापडली होती. सहा वर्षांपूर्वी महावीर नगरामध्ये चक्रवती नदीच्या काठावर महादेवाची पिंड सापडली. त्या सर्व मुर्त्यांची गावकर्‍यांनी त्याच ठिकाणी स्थापना केली.

दरवर्षी येथे मोठे उत्सव होत आहेत. अनसूया मातेची सुंदर सुबक आकर्षक मूर्ती एका खोदकामात सापडली होती. ती एका शासकीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी कोणीतरी चोरून नेली. अद्यापही ती सापडली नाही. येथील गढी मध्येसुद्धा पुरातन काळातील दगडांचे मोठे-मोठे चिरे आढळून आले आहेत. त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. अनेकवेळा खोदकाम करताना या भागात मूर्ती आढळून येतात. या गावाच्या बाजूला दुर्ग किल्ला असून त्या किल्ल्यावर सुद्धा बुजविलेले देवीचे मंदिर लोकांनी खोदून काढले आहे.

गर्दी अन् तणाव

खोदकामात सापडलेली मूर्ती ज्या ठिकाणी सापडली, त्या ठिकाणावरून काही लोकांनी मूर्ती उचलून दुसरीकडे नेली. मात्र, राजेश सारडे यांनी ती येथेच ठेवावी, मी माझी जागा मंदिरासाठी देत आहे, असे म्हणून त्यांनी मूर्ती खोदकामाजवळ आणून ठेवली. त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी तहसीलदार धीरज स्थूल, ठाणेदार राजेश राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली. मात्र, वृत्त लिहिपर्यंत पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आलेले नव्हते.

Popular Articles