spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सनफ्लॅग स्टीलमध्ये ७० फुटांवरून पडून कामगाराचा मृत्यू; मृतदेहासह ४ तास ठिय्या, लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर नोकरी व मदतीवर शिक्कामोर्तब

हंसराज, प्रतिनिधी भंडारा वरठी :- वरठी येथील नामांकित ‘सनफ्लॅग आयरन अँड स्टील’ कंपनीत शनिवारी सकाळी औद्योगिक सुरक्षेचा बळी घेणारी हृदयद्रावक घटना घडली. क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले मारोती महादेव भिवगडे (४५, रा. पाचगाव) यांचा ७० फूट उंचीवरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबाचा एकमेव आधार हिरावल्या गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहासह कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर तब्बल चार तास ठिय्या दिल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

ही घटना १७ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास एसएमएस (SMS) विभागात घडली. मारोती भिवगडे हे कामावर असताना पायऱ्या चढताना अचानक तोल जाऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने भंडारा येथील ‘लक्ष हॉस्पिटल’ येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मारोती यांच्या पश्चात पत्नी अर्चना, मुलगी सिमरन (१८) आणि मुलगा सुमित (१६) असा परिवार आहे. घराचा मुख्य कमावता गेल्याने पाचगावचे सरपंच संतुलाल गजभिये आणि उपसरपंच महेश कळंबे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी दुपारी १ वाजेपासून कंपनी गेटवर आक्रमक पवित्रा घेतला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे आणि माजी आमदार चरण वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. लोकप्रतिनिधींनी व्यवस्थापनाला धारेवर धरत कुटुंबाला योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी केली. प्रदीर्घ चर्चेनंतर, मृताच्या वारसाला कायमस्वरूपी नोकरी, मुलाच्या उच्च शिक्षणाची (ITI/पॉलिटेक्निक) जबाबदारी आणि २ लाख रुपयांची तात्काळ सानुग्रह मदत देण्याचे आश्वासन व्यवस्थापक रामचंद्र दळवी यांनी लेखी स्वरूपात दिले.

या तोडग्यानंतर सायंकाळी ५ वाजता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी उचलण्यात आला. या आंदोलनादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनात सात ठाणेदारांसह मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.