spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विविध प्रलंबित मागण्यांसाठी २३ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘संविधान बचाव संघर्ष समिती’चे धरणे आंदोलन

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील विविध ज्वलंत समस्या आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘संविधान बचाव संघर्ष समिती’च्या वतीने येत्या २३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशात सातत्याने होणारा महापुरुषांचा अपमान, नगर परिषद निवडणुकीत ईव्हीएम (EVM) द्वारे झालेला कथित घोटाळा, रमाई व शबरी आवास योजनेअंतर्गत वाढीव अनुदान मिळणे, तसेच विशेष घटक योजनेतून गाई-म्हशी वाटपात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करणे,

ओबीसी मुला -मुली करिता तालुकास्तरावरील वस्तीगृह, यांसारख्या अनेक मुद्द्यांवर हे आंदोलन केंद्रित असणार आहे.

जिल्ह्यातील ओबीसी मुला-मुलींसाठी तालुका स्तरावर मंजूर असलेली वसतिगृहे तातडीने सुरू करावीत, शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या जाचातून मुक्त करावे, आदिवासी आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत आणि शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे (पैसे) विनाविलंब देण्यात यावेत, या मागण्यांसाठी समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे आंदोलन समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर, मुख्य संयोजक सदानंद इलमे, अजाबराव चिचामे, गोपाळ सेलोकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, रोशन उरकुडे, प्रभा पेंदाम आणि रमेश शाहारे यांच्या नेतृत्वात पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरुवात होईल आणि सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळामार्फत सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले जाईल.

भंडारा जिल्ह्यातील सर्व संविधान प्रेमी नागरिक, शेतकरी आणि युवकांनी आपल्या हक्कासाठी या धरणे आंदोलनात सक्रिय उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेम्भूरणे, सचिव असित बागडे, कोषाध्यक्ष इंजि. रुपचंद रामटेके, निमंत्रक संजय मते आणि भगीरथ धोटे यांनी केले आहे.

Popular Articles