हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी :- लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजा मेंझा/पोहरा परिसरात विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर छापा टाकून पोलिसांनी एकूण ९ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाखनी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रामटेके हे पथकासह परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मौजा मेंझा/पोहरा येथे एक विना क्रमांकाचा हिरव्या रंगाचा ‘जॉन डीअर’ कंपनीचा ट्रॅक्टर आणि निळ्या रंगाची ट्रॉली संशयास्पदरित्या येताना दिसली. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये १ ब्रास रेती अवैधपणे वाहून नेली जात असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी पोलिसांनी चालक निकेश दयाराम आबेडारे (२५, रा. मेळा/भुगाव) आणि ट्रॅक्टर मालक प्रशांत बाळकृष्ण नागलवाडे (३५, रा. न्याहारवाणी, ता. लाखनी) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही रेती भुगाव येथील नदीपात्रातून चोरून नेली जात होती, ज्यामुळे शासनाचा महसूल बुडवण्यासोबतच पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे.
या कारवाईत पोलिसांनी ८ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर इंजिन, १ लाख ५० हजार रुपयांची ट्रॉली आणि ६ हजार रुपयांची रेती असा एकूण ९ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ४९ सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(८), पर्यावरण संरक्षण कायदा कलम ७, ९ आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामटेके, पोलीस शिपाई गायधने व लाखनी पोलीस पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.








