– मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी कामाची पाहणी
नागपूर :- विकास आराखड्यानुसार (डीपी) सेमिनरी हिल्स, सुरेंद्रगड, व गिट्टीखदान या भागातून रविनगर चौकात येण्यासाठी व्हेटरनरी कॉलेजसमोरून ७०० मीटर लांबीचा व २४ मीटर रुंदीचा नवा रस्ता सेमिनरी हिल्स रस्त्याला जोडला जाणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांना अमरावती मार्गावर येण्यासाठी पडणारा अडीच किलोमीटरचा फेरा कमी होणार आहे. या रस्त्याच्या कामाला आवश्यक शासकीय मंजुरी मिळाली असून, या कामाची मनपाचे आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (ता. २७) पाहणी करीत रस्त्या संबधित काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, उद्यान संवर्धक अमोल चौरपगार, उपअभियंता प्रमोद मोकाडे नरेंद्र भांडारकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

सेमिनरी हिल्स, सीपीडब्ल्यूडी क्वार्टस भागातील नागरिकांना अमरावती मार्ग किंवा रविनगर भागात येण्यासाठी जवळपास अडीच किलोमीटरचा वळसा घालून यावे लागत आहे. विकास आराखड्यानुसार (डीपी) नवा मार्ग व्हेटरनरी महाविद्यालयाच्या समोरून निघणार असून, तो सेमिनरी हिल्स मार्गाला जोडला जाणार आहे. रस्त्याच्या बांधकामावर २२ कोटी रुपये खर्च होणार आहे. तेथून तो रस्ता थेट रविनगर चौकात जाणाऱ्या रस्त्याला जोडला जाणार आहे. यामुळे सेमिनरी हिल्स, सीपीडब्ल्यूडी क्वार्टर्स, सुरेंद्रगड व गिट्टीखदान या भागातील नागरिकांना अमरावती मार्गावर येणारे अधिक सोयीचे होणार आहे.
या रस्त्यासाठी नागपूर महानगरपालिकेने माफ्सू व झुडपी जंगलाची जमीन ताब्यात घेतली आहे. यासाठी आवश्यक मंजुरी राज्य सरकारने मनपाला दिल्या आहेत. यामुळे हा रस्ता होण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. सर्व शासकीय मंजुरी मिळाल्यामुळे या कामाला गती द्यावी व त्वरित काम पूर्ण करावे, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी अधिकारी व कंत्राटदारांना दिले.








