spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती व राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि राष्ट्रीय मतदान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील प्रा. राजकुमार श्रीभाते उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. पुण्यशील टेंभुर्णे, प्रा. मंगेश कुकडे आणि प्रा. कागदे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. राजकुमार श्रीभाते यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणादायी जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाले आहे, त्यांनी मतदार नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावला पाहिजे.”

प्रा. मंगेश कुकडे यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतीकार्याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ या घोषणेद्वारे भारतीयांमध्ये राष्ट्रभावना जागृत केली. तसेच, २०११ पासून देशात राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातो, त्यानिमित्ताने सुजाण नागरिक म्हणून सर्वांनी मतदानाबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्नेहल कामाने या विद्यार्थिनीने मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles