– पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे; सक्ती मागे न घेतल्यास मुंबईत धडकण्याचा इशारा
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र परिचर्या परिषदेद्वारे (MNC) परिचारिकांच्या परवाना नूतनीकरणासाठी (Registration Renewal) लादण्यात आलेली ‘कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन’ (CNE) आणि ‘कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंट’ (CPD) ची सक्ती त्वरित रद्द करावी, या मागणीसाठी ‘राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ’ (RMBKS) आरोग्य विभागाने राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुकले आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा प्रजासत्ताक दिनी यशस्वी झाला असून, मागणी मान्य न झाल्यास आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय परिचर्या परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, परिचारिकांना दर पाच वर्षांनी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. यासाठी १५० तास (किंवा ३० क्रेडिट पॉइंट्स) पूर्ण करण्याची जाचक अट घालण्यात आली आहे. मात्र, रुग्णालयातील कामाचा वाढता व्याप, अपुरा पगार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना अशा प्रशिक्षणांसाठी अवाढव्य शुल्क भरणे अन्यायकारक आहे. दर महिन्याला सी.एन.ई. करणे परिचारिकांसाठी मानसिक आणि आर्थिक शोषणाचे ठरत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या तीन टप्प्यांपैकी पहिला टप्पा २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) रोजी पूर्ण झाला. या दिवशी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिचारिकांनी धरणे प्रदर्शन केले. या आंदोलनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलनाची पुढील दिशा खालीलप्रमाणे असेल:
दुसरे चरण: १२ मे २०२६ (आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन) रोजी आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसीय धरणे आंदोलन.
तिसरे चरण: १५ ऑगस्ट २०२६ (स्वातंत्र्य दिन) रोजी आझाद मैदान ते मंत्रालय, मुंबई असा भव्य धडक मोर्चा.
“रुग्णसेवेचे हित आणि परिचारिकांवर होणारा अन्याय लक्षात घेता सी.एन.ई. ची सक्ती रद्द करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आमचा लढा शेवटपर्यंत सुरूच ठेवू,” असा निर्धार आरोग्य विभाग, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने व्यक्त केला आहे.
या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष पल्लवी चौधरी, राज्य कार्याध्यक्ष सुरेश गवई, राज्य महासचिव अविनाश शेंडे आणि विभागीय महासचिव जे. एन. रामटेके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




