– मध्य प्रदेशातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; ४ बैलांची सुटका
हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- सिहोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतूक आणि जनावरांना क्रूर वागणूक देणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह ४ बैल असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मध्य प्रदेशातील तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत गस्तीवर असताना पोलिसांनी बोलेरो पिकअप (क्रमांक MH 40 BL 5538) संशयास्पद स्थितीत अडवले. या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ४ पूर्ण वाढ झालेले लाल-पांढऱ्या रंगाचे बैल निर्दयतेने, त्यांना यातना होतील अशा स्थितीत कोंबून भरलेले आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी रमेश श्रीराम शहारे (वय २६ वर्ष), नरेश धनलाल तुरकर (वय ४० वर्ष) आणि लीखीराम श्रिबल शिवहरे (वय ५६ वर्ष), तिन्ही राहणार नवेगाव, ता. खैरलांजी, जि. बालाघाट (म.प्र.) यांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत प्रत्येकी १५,००० रुपये किमतीचे ४ बैल (एकूण ६०,००० रुपये) आणि ५,००,००० रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आरोपींनी जनावरांना अत्यंत क्रूरतेने वागवून त्यांची अवैध वाहतूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक १७/२०२६, कलम ११ (१) (ड) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई सव्वालाखे, पोलीस हवालदार ईळपाते व सिहोरा पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सिहोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.








