spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बंद पडलेली धान खरेदी तात्काळ सुरू करा; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

– जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; थकीत देयके आणि बोनस त्वरित देण्याची मोहन पंचभाई यांची मागणी

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्यात अचानक बंद करण्यात आलेली धान खरेदी तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांची प्रलंबित देयके आणि बोनसची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी, या मागणीसाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिला आहे.

भंडारा जिल्हा हा मुख्यत्वे धान उत्पादक जिल्हा आहे. मार्केटिंग फेडरेशनमार्फत २२ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात धान खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र, सध्या कोणतीही पूर्वसूचना न देता तांत्रिक कारणे पुढे करून ही खरेदी अचानक थांबवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत आले असून, हजारो क्विंटल धान केंद्राबाहेर पडून आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शेतकऱ्यांना मागील हंगामातील धानाचे पैसे अद्याप पूर्णतः मिळालेले नाहीत. दुसरीकडे, नवीन हंगामासाठी लागणारी मशागत, बियाणे, खते आणि औषधांचा खर्च, तसेच घरखर्च आणि बँक कर्जाची परतफेड यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने धान खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांना धान बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणूक पार पडल्यानंतरही बोनसबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “शासनाने तातडीने बंद पडलेली केंद्रे सुरू करावीत आणि जाहीर केलेला बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करेल,” असे मोहन पंचभाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, जय डोंगरे, भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, शहर अध्यक्ष धनराज साठवणे, नगरसेवक गजानन बादशाह, रिझवान काझी, गजानन झंझाड, नरेंद्र साकुरे, मनोज बागडे, जीवन कावळे, तुळशीराम बिलवणे, हंसराज गजभिये, भजनलाल चौरे, भगवान राऊत, पृथ्वी तांडेकर, रूपचंद नागपुरे, फारुख शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Popular Articles