spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विशेष बातमी: ठाणेदार की ‘भंगार’ चोरांचा सरदार? सरकारी मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणारा ‘खाकी’तला किडा उघड!

सुशांत घाटे,चंद्रपूर :- रक्षकानेच भक्षक व्हावे आणि कायद्याच्या रखवालदारानेच सरकारी तिजोरीवर दरोडा टाकावा, असा संतापजनक प्रकार सध्या जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात चर्चेचा विषय ठरला आहे. ज्या पोलीस ठाण्यात गुन्हेगारांना घाम फुटायला हवा, तिथे चक्क ठाणेदारानेच ‘सरकारी मालमत्ता’ भंगारवाल्याला विकून लाखो रुपयांची माया जमवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वेकोली आणि पॉवर प्लांटच्या चोरीच्या मालावर डल्ला मारणारा हा ‘कावळा-बावळा’ ठाणेदार आता चौकशीच्या फेऱ्यात अडकला असला, तरी त्याच्या दहशतीमुळे तपासाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे ‘२३ लाखांचा’ तो काळा कारभार?

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या परिसरात जप्त केलेली आणि बेवारस म्हणून नोंद असलेली मोठी सरकारी मालमत्ता एप्रिल महिन्यात चक्क गायब करण्यात आली. यामध्ये पोकलेन मशीनचे महाकाय पार्ट, लोखंडी अँगल, रॉड आणि महागड्या तांब्याचा समावेश होता. ही मालमत्ता शासनाच्या मालकीची असताना, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना किंवा लिलावाविना या ‘महाशय’ ठाणेदाराने एका भंगार व्यावसायिकाशी संधान साधले.

असे समजते की, तब्बल २३ लाख रुपयांहून अधिक रकमेचा सौदा करून या ठाणेदाराने अलिखित परवानगी देत रात्रीच्या अंधारात सरकारी मालमत्ता भंगार बाजारात रवाना केली. खाकी वर्दीच्या जोरावर सरकारी संपत्तीची अशी खासगी ‘जागीरदारी’ चालवणारा हा प्रकार पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारा ठरला आहे.

या सर्व काळ्या कारस्थानात ठाणेदाराने आपल्याच हाताखालील ‘मोहरर’वर मोठा दबाव टाकला आहे. चौकशीचा ससेमिरा मागे लागताच, या ठाणेदाराचा संयम सुटला असून त्याची ‘चीड-चीड’ वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा मुख्य साक्षीदार असलेल्या मोहररला “तुझे ऑक्सिजन बंद करीन” धमकी देण्यात आली आहे. जेव्हा मालकच चोर बनतो, तेव्हा मुनिमाने कोणाकडे दाद मागावी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वेकोली आणि पॉवर प्लांटमध्ये चोरीचे सत्र

या ठाणेदाराच्या हद्दीत वेकोली (WCL) आणि औष्णिक वीज केंद्रातील महागड्या मशिनरीच्या चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चोऱ्यांमधील जप्त केलेला मुद्देमालच ठाणेदाराने परस्पर विकल्याचा संशय आहे. “लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” या उक्तीप्रमाणे कर्मचाऱ्यांना शिस्तीचे आणि वागणुकीचे धडे देणारा हा ठाणेदार स्वतः मात्र पोलीस खात्याला लागलेली एक ‘मोठी कीड’ ठरत आहे.

चौकशी की निव्वळ फारस?

सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे, पण प्रश्न असा उभा राहतो की— ‘ती पारदर्शक कशी होणार?’

१. जोपर्यंत तोच ठाणेदार त्या खुर्चीवर विराजमान आहे, तोपर्यंत त्याच्याविरुद्ध साक्ष देण्याची हिंमत कोणाची होईल?

२. ज्या मोहररवर दबाव आहे, तो दहशतीखाली खरे बोलू शकेल का?

३. ज्याने सरकारी मालमत्तेवर दरोडा टाकला, त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल का होऊ नये?

“हा तर खाकीतला दरोडा!”

ज्या हातांनी कायद्याचे रक्षण करायचे, तेच हात जर सरकारी मालमत्ता विकून खिसे गरम करत असतील, तर सामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा? हा ठाणेदार पोलीस स्टेशनला स्वतःची जहागिरी समजत असून, अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करणे गरजेचे आहे.

आता वेळ आलीय ‘बटवलेला माल वटवण्याची’!

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन, प्रथम या ‘बावळ्या’ ठाणेदाराला तिथून हटवणे आवश्यक आहे. जोपर्यंत या किड्याला पोलीस दलातून बाजूला केले जात नाही, तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही. या ठाणेदाराने जो माल ‘बटवला’ आहे, तो त्याच्याकडून ‘वटवणे’ (वसूल करणे) आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे, हाच खऱ्या न्यायाचा मार्ग ठरेल.

सत्ता आणि वर्दीचा माज असणाऱ्या या ठाणेदाराचे ‘ऑक्सिजन’ आता कायद्यानेच बंद करण्याची वेळ आली आहे!

Popular Articles