नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यु) नागपूर जिल्हा मधील शहरी आशा वर्कर यांनी 15 जानेवारी रोजी झालेल्या महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुकीचे दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आशा वर्कर यांनी बूथ सांभाळण्याचे काम केले. बी एल ओ चे काम करणाऱ्या आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका सह इतर कर्मचाऱ्यांना त्वरित निधी वाटप करण्यात आला. परंतु त्या व्यतिरिक्त लावण्यात आलेल्या आशा वर्कर यांना आज पर्यंत कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. मतदान केंद्र स्थळी चहा, पाणी, जेवणाची सोय सर्वांकरता केली असल्यानंतर सुद्धा आशा वर्कर करता कोणतीहीं सोय केल्या गेली नाही. पगारी कर्मचारी असल्यानंतर सुद्धा इतरांना 900 ते 2500 रुपये पर्यंत मोबदला देण्यात आला परंतु आशा वर्कर यांना अकाउंट मध्ये आम्ही तीनशे रुपये पाठवू असे सांगण्यात आले. ते सुद्धा आजपर्यंत मिळालेले नाही. संघटनेमार्फत निवडणुकीच्या तीन दिवस आधी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे नावे प्रत्येक आशा वर्कर यांना एक हजार रुपये मोबदला देण्यात यावा. अशी मागणी केल्यानंतर सुद्धा महानगर पालिका प्रशासनाने त्यावर विचार केलेला नाही. त्यामुळे महानगर पालिका क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो आशा वर्कर आज मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक शेलोकर यांच्या बरोबर चर्चा करण्याकरता महानगर पालिका मुख्यालयात पोहोचल्या. निवडणुका संपल्या महापौर, उपमहापौर बनले. परंतु आशांचा मोबदला केव्हा मिळणार? व किती मिळणार? यावर निवडून आलेले नगरसेवक काही बोलायला तयार नाही. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने आम्हाला 1000 रुपये प्रमाणे मोबदला त्वरित द्या. या मागणी करता शेकडो आशा वर्कर यांनी महानगरपालिका गाठली. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांना तात्काळ पाचारण करण्यात आले. कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र बहिरवार, सि पि एम डॉ. अश्विनी निकम, मुख्य लेखापाल निलेश बाभरे, आशा समन्वयक रेखा निखाडे यांच्यासोबत चर्चा करून वरील विषयावरील मार्ग त्वरित काढावा अशी मागणी करण्यात आली. चार महिन्यापासून आशा वर्कर यांचे मानधन थकीत असून विविध प्रकारे ऑनलाईन व ऑफलाईन कामाचा बोजा आशा वर्कर वर लागण्यात येत आहे. यावरही लक्ष वेधण्यात आले. त्यावर अधिकाऱ्यांनी राज्य व केंद्रांनी कोणताही निधी पाठवलेला नसून आमच्यावर राज्य व केंद्राकडून कामाचा ताण वाढत असून वरील काम आशा वर्कर कडून करून घ्या. अशी ताकीद केल्या जात असल्याचे बोलून दाखवले. आशा वर्करच्या विविध समस्या वर आम्ही त्वरित तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.








