spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांची भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात बदली  

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांची बदली होऊन ते सह आयुक्त,गट – अ,जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे रुजू झाले आहेत. त्यांच्या बदलीनिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात.

चंदन पाटील यांनी ३ मे २०२३ मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात त्यांना देण्यात आलेल्या अनेक विभागांची जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. प्रशासकीय कामकाजात कार्यकुशलता, वेळेचे भान आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास व प्रेरणा निर्माण केली. त्यांच्या कार्यकाळात सामान्य आस्थापना विभाग,जनगणना,पाणीपुरवठा,बांधकाम,लेखा विभाग, पीएम ई बस योजना अशा विविध उपक्रमांना गती मिळाली.

विशेषतः चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान त्यांनी निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन, विभागनिहाय समन्वय, कर्मचारी व्यवस्थापन, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रभावी नियंत्रण व मार्गदर्शन केले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व यशस्वीरीत्या पूर्ण होण्यास मोठी मदत झाली.

निरोप समारंभात आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपायुक्त संदीप चिद्रवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून चंदन पाटील यांच्या नेतृत्वशैलीचे आणि सौजन्यपूर्ण वर्तनाचे विशेष कौतुक केले. सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आणि नेहमी प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहील, असे मनोगत अनेकांनी व्यक्त केले.

अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी आपल्या भाषणात चंद्रपूर महानगरपालिकेत काम करताना त्यांच्या कार्यकाळात लाभलेल्या तीनही आयुक्तांच्या मार्गदर्शनात कार्य करण्याचा अनुभव हा उत्तम असल्याचे सांगितले. येथील अधिकारी कर्मचारी यांचे मिळालेलं सहकार्य, टीमवर्क आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन पुढेही नेणार असल्याचे सांगितले तसेच सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि आयुक्तांचे आभार मानले.

Popular Articles