spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

झरी जामणीत ‘संपूर्णता अभियाना’ला प्रारंभ

– आमदार संजय देरकर यांच्या हस्ते उद्घाटन

यवतमाळ :- निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत झरी जामणीत “संपूर्णता अभियान 2.0” चे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते पंचायत समितीच्या मुख्य सभागृहात नुकताच पार पडले.

या कार्यक्रमास तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींचे सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत विकास अधिकारी तसेच विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

28 जानेवारी ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत महिला व बालविकास, पशुसंवर्धन, आणि शिक्ष्ण विभागांनी एकत्रितपणे काम करुन दर्शकांची 100 टक्के संपृक्तता साध्य करण्याचे आवाहन आमदार संजय देरकर यावेळी केले.

या दर्शकांमध्ये महिला व बालविकास विभागांतर्गत 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील पूरक आहार घेणारी मुले, अंगणवाडी केंद्रातील नोंदणीकृत मुलांची मोजमाप कार्यक्षमता, कार्यरत शौचालय असलेली अंगणवाडी केंद्रे तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेली अंगणवाडी केंद्रे हे दर्शक निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षण विभागांतर्गत पुरेशा मुलींच्या शौचालय सुविधांसह शाळा हा दर्शक असून, पशुसंवर्धन विभागांतर्गत लसीकरण झालेल्या गोवंशीय जनावरांची टक्केवारी हा दर्शक आहे.

यावेळी आमदार संजय देरकर यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून निर्धारित कालावधीत सर्व दर्शकांमध्ये शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याचे आवाहन केले. आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा उद्देश मागासलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण व जलद विकास साधणे हा असून आरोग्य, पोषण, शिक्षण, शेती, सामाजिक विकास आणि मूलभूत सुविधांमध्ये ठोस सुधारणा घडवून आणणे हे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा व तालुका प्रशासनाने एकत्रितपणे काम करून विकासाची गती वाढवावी, असे आवाहनही करुन त्यांनी उपस्थितांना “संपूर्णता अभियान 2.0” ची शपथ दिली.

यावेळी झरी जामणीचे तहसिलदार अक्षय रासने, गटविकास अधिकारी र. वि. सांगळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिता भगत, गट शिक्षणाधिकारी निलेश खेरनार, तालुका पशुसंवर्धन अधिकारी जगताप, आकांक्षित तालुका कार्यक्रम फेलो अनिल नरवाडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles