spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिघोरी-नान्होरी शिवारात बिबट्या जेरबंद; वनविभागाची लाखनी परिसरात यशस्वी मोहीम

– बिबट्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले; मानवी हानी टाळण्यात यश

हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी :- लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दिघोरी-नान्होरी येथील शेत शिवारात शिरलेल्या एका बिबट्याला वनविभागाच्या पथकाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले. ही कारवाई रविवारी (दि. १५ फेब्रुवारी) करण्यात आली. जेरबंद केलेला बिबट्या सुदृढ असल्याने त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले असून, यामुळे परिसरात निर्माण झालेली दहशतीचे वातावरण निवळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाखनी वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र रामपुरी अंतर्गत मौजा दिघोरी-नान्होरी येथील गावाजवळील शेत शिवारात वन्यप्राणी बिबट्या असल्याची माहिती रविवारी वनकर्मचाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या मानवी वस्तीजवळ असल्याने मोठा जनसमुदाय जमा झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभागाने स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देऊन सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले.

या घटनेची माहिती तातडीने उपवनसंरक्षक (भंडारा) योगेंद्र सिंग, सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे, सचिन निलख आणि लाखनीचे पोलीस निरीक्षक बारसे यांना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भंडारा येथील वन्यप्राणी बचाव दल (RRT) आणि शीघ्र कृती दलास पाचारण करण्यात आले. बिबट्या मानवी अधिवासात शिरल्याने संघर्ष टाळण्यासाठी त्याला जेरबंद करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी औषधी सज्ज केली. त्यानंतर आरआरटी टीमचे शार्प शूटर अनिल शेळके यांनी अचूक डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध केले. बिबट्या बेशुद्ध होताच त्याला यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत बिबट्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

सदर मोहीम उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे, सचिन निलख, पोलीस निरीक्षक बारसे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय, जीवशास्त्रज्ञ शुभम मोदनकर, वनपाल जितेंद्र बघेले, वनरक्षक अजय उपाध्ये, तुकाराम डावखोरे, बालाजी कदम, चालक अनिल शेळके आणि आरआरटी टीमचे सदस्य शशांक तुरस्कर, निशी वानखेडे, अविनाश नागपुरे, नरेंद्र उर्कुडकर यांनी पार पाडली. या मोहिमेत लाखनी पोलीस विभाग, स्थानिक सरपंच, पोलीस पाटील आणि गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वन्यप्राणी किंवा मानव-वन्यजीव संघर्षाची कोणतीही घटना घडल्यास स्थानिक नागरिकांनी तात्काळ वनविभागाच्या नियंत्रण कक्षाशी ०७१८४-२५२२८३ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या वन अधिकाऱ्याला माहिती द्यावी, जेणेकरून संभाव्य हानी टाळता येईल, असे आवाहन भंडारा वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

Popular Articles