spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘बालिका तस्करीचा मास्टरमाईंड’ डॉ. नितेश वाजपेयीचा जामीन अर्ज फेटाळला; भंडाऱ्यात विक्रीचे मोठे रॅकेट उघड!

– डॉ. नितेश वाजपेयीने उपचाराचे आमिष दाखवून पालकांची केली फसवणूक; १० दिवसांच्या चिमुरडीचा केला सौदा!

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत नवजात बालिकेची विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोंदिया येथील डॉक्टर नितेश नरेंद्रकुमार वाजपेयी याने अटकेपासून वाचण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या कारवाईमुळे बालक तस्करी करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणाची सुरुवात २ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली. भंडारा येथील ‘चाइल्ड हेल्पलाईन’ (टोल फ्री क्र. १०९८) वर एक निनावी माहिती प्राप्त झाली की, पांढराबोडी (ता. जि. भंडारा) येथील मालती प्रकाश वाघमारे या ४४ वर्षीय महिलेने आपल्या घरी १० दिवसांची एक नवजात बालिका आणली आहे. माहिती मिळताच समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार आणि त्यांच्या पथकाने तत्काळ मालती वाघमारे हिच्या घरी जाऊन चौकशी केली. तिने ही मुलगी गोंदिया येथून आणल्याचे सांगितले, मात्र अधिक चौकशीसाठी बाल कल्याण समितीसमोर हजर राहण्यास नकार दिला.

३ फेब्रुवारी रोजी ही महिला बालिकेला घेऊन चारचाकी वाहनाने पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरठी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुशारी फाट्यावर संशयास्पद वाहन अडवले असता, त्यामध्ये पौर्णिमा सतीश धुर्वे (रा. गोंदिया) हिच्या ताब्यात नवजात बालिका मिळून आली. तिच्याकडे कोणतेही कायदेशीर दस्तऐवज नसल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. बालिकेच्या मूळ माता-पित्यांची परिस्थिती बेताची असून ही त्यांची तिसरी मुलगी होती. बालिकेची प्रकृती खालावल्याने गोंदियातील डॉ. नितेश वाजपेयी याच्याकडे तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. “उपचाराचा खर्च तुम्हाला परवडणार नाही, मी एका सामाजिक संस्थेच्या मदतीने तिला नागपूरला पाठवतो,” असे खोटे आश्वासन डॉक्टरने पालकांना दिले. प्रत्यक्षात डॉक्टरने आपल्या हस्तकांमार्फत मालती वाघमारे हिला या बालिकेची मोठी रक्कम घेऊन विक्री केली होती. पैशांचे व्यवहार धनादेशाद्वारे (Check) झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी वरठी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ३६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(४), १३७(२), ३(५) तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ च्या कलम ८० व ८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील आरोपींची नावे:

🔹 डॉ. नितेश नरेंद्रकुमार वाजपेयी (रा. गोंदिया) – मुख्य आरोपी.

🔹 मालती प्रकाश वाघमारे (रा. पांढराबोडी, भंडारा).

🔹 ललेश्वरी नंदकिशोर सादेपाच (रा. रामनगर, गोंदिया) – अटक करण्यात आली आहे.

🔹 पौर्णिमा सतीश धुर्वे (रा. रामनगर, गोंदिया).

🔹 उमेशसिंग रामचंद्रसिंग गहलोत (रा. गोंदिया).

🔹 सागर सिक्का (रा. गोंदिया).

सध्या आरोपी ललेश्वरी सादेपाच ही पोलीस कोठडीत असून मुख्य आरोपी डॉ. वाजपेयी आणि इतर साथीदार पसार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी (साकोली) शिवम विसापुरे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. या टोळीने आणखी किती बालकांची तस्करी केली आहे का, यादृष्टीनेही पोलीस तपास चक्रावून पाहत आहेत.

Popular Articles