Thursday, February 26, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आत्ममग्न अध्यक्षाचे आव्हान

खेळाडूंचे यश वा लष्कराचा पराक्रम जणू आपल्या नेतृत्वामुळेच वाढल्याचा आव आणणार्‍या ट्रम्प यांनी वार्षिक भाषणात ठोस मुद्दे वा धोरणे न मांडता विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली…

एक वेळ ताटीवरील मढ्यात पुन्हा चेतना निर्माण करता येईल. पण आत्मप्रेमात मग्न-मशगुलांस वास्तवाचे भान आणून देणे अशक्य. अशांची अन्य उदाहरणे असली तरी तूर्त त्यांचे शिरोमणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत. कारण त्यांचे ‘स्टेट ऑफ द युनियन ॲड्रेस’ (एसओटीयू – सोटू). म्हणजे राष्ट्रास उद्देशून केलेले भाषण. अभिभाषणासारखी ही अमेरिकी परंपरा. नवीन वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतील एखाद्या दिवशी अध्यक्ष कायदेमंडळाच्या संयुक्त बैठकीसमोर- म्हणजे सेनेट आणि हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज मिळून होणार्‍या अमेरिकी काँग्रेससमोर- भाषण करतात आणि देशाची परिस्थिती, आव्हाने, त्यावरील उपाय इत्यादी विषयांस स्पर्श करतात. या भाषणासाठी विविध मान्यवरांसही खास निमंत्रण दिले जाते.

अमेरिकी न्यायव्यवस्थेतील अधिकारी व्यक्तीही त्यास हजर असतात आणि हे भाषण संपल्यावर विरोधी पक्षनेता आपल्या पक्षाच्या वतीने भाषणावर अधिकृत प्रतिक्रिया देतो. ट्रम्प यांच्या दुसर्‍या खेपेतील हे महत्त्वाचे भाषण. त्याची प्रमुख कारणे तीन. एक म्हणजे गेल्या वर्षी अध्यक्षपदावर स्वार होऊन त्यांस पुरेसा वेळ मिळालेला नव्हता. दुसरे, यंदाच्या भाषणाआधीच सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांस दिलेला तडाखा. आणि तिसरे कारण म्हणजे अमेरिकेतील परंपरेनुसार होऊ घातलेली मध्यावधी निवडणूक. अध्यक्षांच्या चार वर्षीय कारकीर्दीच्या मध्यबिंदूवर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी त्यासाठी मतदान होते. यात सेनेटमधील ४५ आणि हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज या लोकप्रतिनिधिगृहातील ४३५ जागांवर नवे प्रतिनिधी निवडले जातील. या दोन सदनांपैकी एका तरी ठिकाणी ट्रम्प यांस पराभव सहन करावा लागेल, असे म्हटले जाते. तो टाळण्यासाठी हे शेवटचे ‘सोटू’. त्याचा पुरेपूर वापर ट्रम्प यांनी केला आणि आपल्या एक तास ४७ मिनिटांच्या विक्रमी भाषणात या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. त्यावर भाष्य गरजेचे.

कारण या संपूर्ण भाषणात ट्रम्प यांनी आपले किती उत्तम सुरू आहे हे सांगण्यापेक्षा प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅट्स हे किती नालायक आहेत यावर भर दिला. डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेसमोरील आर्थिक आव्हानांचा मुद्दा लोकप्रिय करण्यासाठी ‘परवडण्याजोगे’ (ॲफोर्डिबिलिटी) हा परवलीचा शब्द वापरण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात अलीकडे केली. म्हणजे अन्नधान्याचे दर, घरे, प्रवासखर्च, रोजगारनिर्मिती, थिजलेल्या वेतनश्रेणी इत्यादी कोणताही मुद्दा असो. नागरिकांस जे काही आहे ते परवडणारे आहे का, असे डेमॉक्रॅट्स विचारू लागले आहेत. त्यांस उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ट्रम्प अस्वस्थ झाले आणि त्याबाबतची नाराजी त्यांच्या भाषणांतून थेट प्रक्षेपित झाली.

ट्रम्प हे दूरचित्रवाणीवरचे कलाकार. त्यामुळे ‘टीआरपी’चे महत्त्व ते जाणतात. त्याचे प्रत्यंतर यंदाच्या ‘सोटू’ भाषणात दिसले. भाषणात मजकूर काही नसला की वक्ता मनोरंजनास प्राधान्य देतो. ट्रम्प यांनी आज ते केले. बर्फावरील हॉकी स्पर्धेत विजेत्या संघातील खेळाडूंस त्यांनी अत्यंत नाट्यपूर्णपणे या समारंभात पेश केले आणि आपल्या धोरणांमुळे हे विजेतेपद अमेरिकेस मिळाल्याची बढाई ध्वनित केली. ती हास्यास्पद होती. जेव्हा एखाद्या सरकारप्रमुखाला खेळाडूंस ओढून ओढून जवळ घेण्याची, मिठीत घेण्याची गरज वाटते तेव्हा ती महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपणास काही फारसे जमत नसल्याची कबुली असते.

अमेरिकेत लगेच या भाषणाच्या शास्त्रोक्त विच्छेदनाची प्रथा आहे. सीएनएन, बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आदी माध्यमांनी हा उद्योग अत्यंत निर्भयतेने केला. ट्रम्प यांनी किती मुद्द्यांवर आपल्या भाषणात ‘फेकाफेकी’ केली याचे तपशील लगोलग या माध्यमांतून प्रसृत केले गेले. ट्रम्प म्हणाले काय आणि वास्तव काय याचे ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ असे माध्यम- सादरीकरण ही तेथील लोकशाहीच्या जिवंतपणाची साक्षच. या भाषणानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नवनिर्वाचित नेत्या, व्हर्जिनियाच्या गव्हर्नर (मुख्यमंत्री) ॲबिगेल स्पॅनबर्गर यांनी नागरिकांस फक्त तीन प्रश्न विचारले : अध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे तुमचे जगणे अधिक सुखी झाले आहे का? तुम्ही अधिक सुरक्षितता अनुभवत आहात का? आणि हा अध्यक्ष आपल्यासाठी काम करतो असे तुम्हांस वाटते का? कोणत्याही खर्‍या लोकशाहीत सत्ताधार्‍यांविषयी या तीनही प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच येतील. पण ट्रम्प यांना याची फिकीर नाही. आपल्यामुळे अमेरिका किती महान होऊ झाली आहे, या आभासात ते मग्न आहेत. ती तशी आहे किंवा काय याचे उत्तर नोव्हेंबरात मिळेल. पण तोवर तरी रिपब्लिकनांतील मोजके शहाणे आणि अन्यांस या आत्ममग्न अध्यक्षाचे आव्हान झेलावे लागेल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com