spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मेटीखेडा येथे ‘सीखें’च्या वतीने शैक्षणिक प्रदर्शन

– ‘ग्रामीण भागातील मुलांमध्ये झालेला बदल ‘सीखें’ उपक्रमाचे यश

यवतमाळ :- कळंब तालुक्यातील मेटीखेडा येथे जिल्हा परिषद केंद्र शाळेत ‘सीखें’ संस्थेच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रदर्शनीचे आणि देणगीदारांच्या भेटीचे आयोजन गुरुवारी, २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी गणित आणि भाषा विषयातील अवघड संकल्पना अत्यंत सोप्या पद्धतीने सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, अधिव्याख्याता पुनीत मातकर, एसबीआय फाऊंडेशनचे प्रतिनिधी प्रवीणकुमार आणि शारोल शिबू, मेटीखेडाचे केंद्रप्रमुख विकास दरणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती न्याहारे, सीखेंच्या अर्चना शिंदे, डॉ. शरदचंद्र पाटील, मुख्याध्यापिका नलीनी भेंडे आदी उपस्थित होते. या प्रदर्शनीमध्ये यजमान मेटीखेडा शाळेसह किन्हाळा, पालोती, पार्डी (नस्करी) आणि मार्कंडा येथील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता.

विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील संकल्पना केवळ पाठांतर न करता, त्या प्रत्यक्ष जीवनात कशा वापरता येतात, याचे प्रभावी सादरीकरण केले. प्रदर्शनात पाहुण्यांसह पालक व विद्यार्थ्यांनी गणित आणि भाषेचा नाविन्यपूर्ण मिलाफ बघितला. प्रदर्शनात गणित विषयातील अपूर्णांक, भिन्नछेद व समछेद अपूर्णांक, ‘नंबर बॉण्ड’ आणि ‘ग्रिड पेपर’ (चौकटीचा कागद) यांसारख्या संकल्पना मॉडेल्सच्या आधारे स्पष्ट केल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष साहित्याचा वापर करून गणित कसे सोडवावे, याचे प्रात्यक्षिक दिले. भाषा विषयाच्या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली हस्तलिखित पुस्तके आकर्षणाचे केंद्र ठरली. गोष्टीचे घटक ओळखणे, ‘सुरूवात, मग, नंतर, शेवट’ या पद्धतीनुसार सारांश सांगणे आणि स्वकल्पनेतून कथा लिहिणे यांत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे दर्शन घडले.

सीखें संस्थेच्या वतीने कळंब, बाभूळगाव तालुक्यात सिखें संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या ‘टीआयपी’ उपक्रमामुळे शिक्षकांना विविध अध्यापन पद्धती आत्मसात करता आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शिकण्याचा आनंद घेता आला. त्यांच्यात विषयाचे सादरीकरण करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला, असे कौतुकोद्गार प्राचार्य डॉ. राऊत यांनी काढले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांची विषयाची समज आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला. ग्रामीण भागातील मुलांमध्ये झालेला बदल ‘सीखें’ उपक्रमाचे यश दर्शवते, अशी प्रतिक्रिया यावेळी एसबीआय फाऊंडेशनचे प्रवीणकुमार यांनी दिली. इतरही मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक केले.

यावेळी सीखेंचे जिल्हा व्यवस्थापक संभाजी भिसे, सह व्यवस्थापक नितीन पखाले, मोहन चुक्काबोटलावार, विकास नागोसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेटीखेडा शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी भेंडे व शिक्षकवृंद तसेच किन्हाळा, मार्कंडा, पार्डी आणि पालोती येथील शिक्षक व सीखे कोच यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांचा आत्मविश्वास पाहून आनंद व्यक्त केला.

Popular Articles