spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नेहरूनगर झोन अंतर्गत जयभीम चौक रमाई आंबेडकर मार्गावर अवैध चिकन मटणची दुकाने

– मनपा प्रशासन झोपलेले: सहायक आयुक्त, झोनल अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांच्या निलंबनाची ॲड. धर्मपाल मेश्राम यांची मागणी

नागपूर :- नेहरूनगर झोनमधील प्रभाग क्रमांक 26, जयभीम चौक रमाई आंबेडकर मार्गावर अनेक अवैध चिकन मटणची दुकाने वाढल्याने होत असलेल्या त्रासाबाबत जनतेने अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. वारंवार करण्यात येत असलेल्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले, झोनल अधिकारी तोरसकर आणि स्वच्छता निरीक्षक सोहम बागडे यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करावे आणि सदर मार्गावरील चिकन मटणची सर्व दुकाने सुद्धा तात्काळ बंद करावी, अशी मागणी माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

प्रभाग 26 मधील नागरिकांकडून अनेकदा लेखी स्वरूपात तक्रारी केल्यानंतरही अवैध चिकन मटणच्या दुकानांवर कारवाई करण्यात आलेली नाही. या अवैध दुकानांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, सोबतच अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेवारस कुत्र्यांची संख्या वाढली आहे, परिणामी कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.

परिसरामध्ये अस्वच्छता, बेवारस कुत्र्यांची संख्या, तेथील अतिक्रमणामुळे वाढलेली अपघातांची शक्यता अशा अनेक तक्रारी वारंवार केल्यानंतरही प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी दिल्या व त्या सर्व तक्रारी वर्ग करण्यात आल्या, मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, असे ॲड. मेश्राम यांनी सांगितले.

यासंदर्भात महापौर नीता ठाकरे यांची भेट घेऊन सदर मार्गावरील अवैध दुकाने आणि त्यांना अभय देणारे झोनचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील कारवाईच्या अनुषंगाने मागणी करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.

Popular Articles