– सकाळपासूनच पिचकारी आणि गुलाल खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- रंगांचा सण असलेल्या होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह भंडारा जिल्ह्यात शिगेला पोहोचला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा विविध रंगांनी आणि आकर्षक पिचकाऱ्यांनी न्हाऊन निघाल्या असून, सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सण शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनानेही चोख तयारी केली आहे.
भंडाऱ्यातील मुख्य बाजारपेठेत रंगेबेरंगी गुलाल आणि विविध रंगांची दुकाने सजली आहेत. यंदा बाजारपेठेत रासायनिक रंगांऐजी नैसर्गिक आणि हर्बल रंगांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. आरोग्याची काळजी घेत नागरिक ‘इको-फ्रेंडली’ होळी साजरी करण्याकडे कल देत आहेत. बच्चेकंपनीसाठी बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक पिचकाऱ्या दाखल झाल्या असून, डोरेमॉन, छोटा भीम आणि बाहुबली यांसारख्या पिचकाऱ्या मुलांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.
होळीच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्याच्या बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच नागरिक आपल्या कुटुंबासह रंग आणि पिचकाऱ्यांच्या खरेदीसाठी बाहेर पडल्याने बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. गुलालाच्या विविध छटांनी दुकाने सजली असून लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वांमध्येच सणाचा उत्साह दिसून येत आहे.
होळीचा सण सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग सज्ज झाला आहे. शहराच्या मुख्य चौकात आणि गर्दीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. “सुरक्षित होळी, आनंदाची होळी” साजरी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे.
एकूणच, भंडाऱ्यात होळीच्या स्वागताची जय्यत तयारी झाली असून संपूर्ण जिल्हा आता रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाला आहे.








