– २०२७ च्या जनगणनेत स्वतंत्र कॉलम आणि यूजीसी समता विधेयक लागू करण्याची प्रमुख मागणी
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- राज्यातील ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज नागपूर येथील ऐतिहासिक संविधान चौकात विशाल धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात आपला सहभाग नोंदवण्यासाठी भंडारा जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येने सकल ओबीसी बांधव बसेस व खाजगी वाहनांनी नागपूरकडे रवाना झाले आहेत.
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत ओबीसींच्या वतीने मोर्चे, उपोषणे आणि धरणे आंदोलने केली जात आहेत. मात्र, वारंवार निवेदने देऊनही सरकारने अद्याप ठोस पावले उचलली नसल्याने ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, आज नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
या आंदोलनामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र ‘कॉलम’ असावा, जेणेकरून समाजाची अचूक आकडेवारी समोर येईल. तसेच, ‘यूजीसी (UGC) समता विधेयक २०२६’ नुसार लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला आहे.
आज सकाळी भंडाऱ्यातील विविध भागांतून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. “ओबीसींच्या हक्काची जनगणना झालीच पाहिजे,” अशा घोषणा देत शेकडो बांधव बसेसच्या माध्यमातून नागपूरच्या दिशेने रवाना झाले. यामध्ये युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.
सरकारने आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सकल ओबीसी समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. आजच्या या धरणे आंदोलनामुळे नागपुरातील संविधान चौक ओबीसी बांधवांच्या उपस्थितीने गजबजणार असून, प्रशासनावर या आंदोलनाचा किती प्रभाव पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








