हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील शिरपूर येथील आरटीओ चेक पोस्टवर सुरू असलेल्या संघटित अवैध वसुलीचा पर्दाफाश भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केला आहे. २८ फेब्रुवारी रोजी खासदारांनी या चेक पोस्टला अचानक भेट दिली असता, ट्रकचालकांकडून उघडपणे ५०० ते १५०० रुपयांपर्यंतची बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास तिथेच ‘छावणी’ टाकून आंदोलन करण्याचा इशारा खासदारांनी दिला आहे.
शिरपूर चेक पोस्टवर स्टॅम्पच्या नावाखाली ट्रकचालकांकडून ५०० ते १५०० रुपये रोख स्वरूपात घेतले जात आहेत. ही वसुली केवळ प्रशासकीय नसून एक ‘सिंडिकेट’ असल्याचे खासदारांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या वसुलीला विरोध करणाऱ्या ट्रकचालकांना मारहाण करण्यासाठी काही गावगुंड हातात लाठ्या-काठ्या घेऊन उभे असतात. या दहशतीमुळे ट्रकचालक निमूटपणे पैसे देत असल्याची तक्रार चालकांनी खासदारांकडे केली.
यापूर्वी दोनदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई का झाली नाही? असा सवाल डॉ. पडोळे यांनी उपस्थित केला आहे. यावरून या अवैध वसुलीला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित खिडकीतून जमा होणाऱ्या या अवाढव्य रकमेचा हिशोब कुठे जातो आणि हा अधिकृत आदेश कोणी दिला, याची स्पष्टता प्रशासनाने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी, चेक पोस्टवरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करावे, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासावेत, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही तर जनतेचे काय?
“एकीकडे जनतेचा खासदार या अवैध प्रकाराला वाचा फोडत आहे, तरीही कारवाई होत नसेल, तर सर्वसामान्य जनता या व्यवस्थेत कशी सुरक्षित राहणार?” असा संतप्त सवाल डॉ. पडोळे यांनी विचारला आहे. ही अवैध वसुली जोपर्यंत कायमस्वरूपी बंद होत नाही, तोपर्यंत आपण स्वतः त्या ठिकाणी थांबून आंदोलन करू, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.








