spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी ‘इलेक्ट्रिक मॅन’ अभय डी. रंगारी यांना ‘प्रबोधिनी स्टार’ पुरस्कार प्रदान

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात आपल्या प्रखर विचारांनी आणि कृतीशील प्रबोधनाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे विद्रोही महाकवी तथा ‘इलेक्ट्रिक मॅन’ अभय देवाजी रंगारी यांना ‘प्रबोधिनी स्टार’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. प्रबोधिनी न्यूज आणि प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूहाच्या वतीने नागपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रणिती करमळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शाल देऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

विरोधकांच्या बदनामीला प्रबोधनातून चपराक

अन्याय, शोषण, विस्थापन आणि अंधश्रद्धेविरोधात सातत्याने आवाज उठवणारे अभय रंगारी हे जनसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात. सामाजिक कार्यात सक्रिय असताना विरोधकांकडून अनेकदा त्यांचे मानसिक खच्चीकरण आणि बदनामीचे प्रयत्न झाले. मात्र, या सर्व विरोधाला न डगमगता त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून प्रबोधनाचा मार्ग निवडला. त्यांच्या या लढाऊ वृत्तीमुळेच ते आज युवकांच्या हृदयातील ‘स्टार’ बनले आहेत.

“जिथे जनता प्रामाणिक नाही, तिथे नेते आणि अधिकारी प्रामाणिक कसे मिळणार?” असा थेट आणि रोखठोक सवाल अभय रंगारी नेहमीच उपस्थित करतात. लाचखोरी रोखण्यासाठी जनतेनेच सजग व्हावे, ही त्यांची ठाम भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक विचारधारेवर निष्ठा ठेवून त्यांनी मतदान जनजागृती, मूलभूत कर्तव्ये आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठे कार्य केले आहे.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी आपला निवडणूक जाहीरनामा चक्क स्टॅम्प पेपरवर प्रसिद्ध करण्याचे धाडस दाखवले होते. त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयाची राज्यभर चर्चा झाली होती. विशेष म्हणजे, अशाच प्रकारची संकल्पना गाजलेल्या दक्षिण भारतीय ‘गेम चेंजर’ (Game Changer) चित्रपटातही पाहायला मिळाल्याचे बोलले जात आहे, जे त्यांच्या राजकीय दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते.

अभय रंगारी सध्या ‘राष्ट्रीय किसान मोर्चा’चे भंडारा जिल्हा संयोजक म्हणून शेतकरी आणि वंचितांच्या प्रश्नांवर लढा देत आहेत. त्यांना यापूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजसेवक पुरस्कार, गोल्डन पिकॉक अवॉर्ड, मानवाधिकार पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक विश्लेषणाद्वारे आपला ठसा उमटवणाऱ्या या लोकनायकाच्या जीवनप्रवासावर लवकरच एक चित्रपट येणार असल्याची चर्चा असून, त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्या या नवीन शिरपेचातील मानाच्या तुऱ्याबद्दल (प्रबोधिनी स्टार पुरस्कार) जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular Articles