spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

· देशातील पहिल्या सर्वेक्षण योजनेतून 15 हजार युवकांना प्रशिक्षण आणि पाच हजार रोजगारनिर्मितीचा संकल्प

मुंबई :- युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत 2047’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे. शासनाच्या या संकल्पनेमध्ये युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना देशातील अशी पहिलीच सर्वेक्षण योजना असून रोजगार निर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने महत्वाचे उचललेले पाऊल राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

मुंबईतील वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम भागातील (एच पश्चिम वॉर्ड) सुमारे 55 हजार घरांतील युवकांचा कौशल्य क्षमता कल जाणून घेण्यासाठी सुरू होत असलेल्या ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यांच्याच संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे सर्वेक्षण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील नॅशनल कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या योजनेच्या उद्घाटन समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह कौशल्य विकास उपायुक्त आनंद माळी, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे विभागीय संचालक सी.एस. मूर्ती, कौशल्य विकास विभाग मुंबईचे उपायुक्त सचिन जाधव, सहायक आयुक्त शैलेश भगत, नॅशनल कॉलेजच्या प्राचार्य नेहा जगतियानी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागातील अधिकारी, उद्योजक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले, भारताकडे लोकसंख्येचे सामर्थ्य आहे. युवकांना योग्य दिशा, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची संधी मिळत असल्याने भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो. ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ हा युवकांच्या क्षमता आणि कौशल्य कल जाणून घेण्यासाठीचा देशातील पहिला उपक्रम आहे. एआय-आधारित आणि पारदर्शक पद्धतीने 18 ते 40 वयोगटातील युवकांचा सर्वेक्षणाद्वारे डेटा संकलित करुन त्याआधारे युवकांची कौशल्ये ओळखून त्यांना प्रशिक्षण संस्थांशी जोडले जाईल. या सर्वेक्षणानंतर 2027 पर्यंत सुमारे 15 हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचा आणि त्यापैकी पाच हजार युवकांना रोजगार किंवा उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा संकल्प आहे. यासाठी उद्योग, विविध कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी समन्वय साधून रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी साखळी व्यवस्था उभी केली जाईल. यासाठी शासनाबरोबरच महाविद्यालयांनी आणि युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड शेलार यांनी केले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी युवकांना मुंबईत विविध क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सांगून त्यांचा कल जाणून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले तर ते रोजगार आणि स्वयंरोजगार क्षेत्रात मोठे योगदान देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला. पुढील दोन ते तीन महिन्यात राबविण्यात येणारे सर्वेक्षण, युवकांच्या कलानुसार प्रशिक्षण आणि रोजगार अथवा स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन या तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल देशातील या पहिल्या सर्वेक्षण योजनेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागाबरोबरच उद्योग, कामगार, महानगरपालिका, बचतगट, विविध क्षेत्रातील उद्योजक यांचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांचा कल विचारात घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने महाविद्यालये, नागरिक आणि युवकांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कटियार यांनी केले.

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेच्या ‘सक्षम युवक, सक्षम राज्य’ या लोगोचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध उद्योजकांसमवेत प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्यातील पश्चिम विभागीय कौशल्य स्पर्धेतील (राष्ट्रीयस्तर) विजेत्या विध्यार्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कौशल्य विकास विभागाच्या वतीने सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी आभार मानले.

सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेविषयी

सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेचा उद्देश हा 18-40 वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांचा कल (interest) लक्षात घेऊन संबंधित उमेदवारांना प्रशिक्षणाअंती रोजगारक्षम बनविणे हा आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात सापिओ ॲनालायटीक या संस्थेद्वारे एच पश्चिम वार्डातील जवळपास 55 हजार घरी भेट आणि एआय आधारित सर्वेक्षण करण्यात येईल. सर्वेक्षणांतर्गत प्रत्येक घरातील उमेदवारांची विहित नमुन्यामध्ये माहिती जमा करण्यात येईल.

विशेषत: 18-40 वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांचे शिक्षण व रोजगार मिळवण्याकरीता आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त करण्याचा कल जाणून घेण्यात येईल. संबंधित उमेदवारांना शासनाद्वारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येईल व त्या अनुषंगाने उमेदवारांचा कौशल्य प्राप्त करून घेण्याचा कल नोंदविण्यात येईल.

उपलब्ध असलेले अधिकृत कौशल्य प्रशिक्षण संस्था त्याचप्रमाणे नजीकच्या अंतरावर उपलब्ध करुन घेण्यात येईल. उमेदवाराने कौशल्य प्रशिक्षणाकरिता दाखविलेल्या कलानुसार संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू करण्यात येऊन याठिकाणी उमेदवारांना अभ्यासक्रमनिहाय प्रशिक्षण देण्यात येईल.

उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रशिक्षण संस्थेद्वारे नजीकच्या उद्योजक/ आस्थापना येथे उमेदवारांना प्रशिक्षण संस्थेद्वारे रोजगार/ स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल.

उद्योजक/ आस्थापना नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, वय वर्षे 18-40 च्या उमेदवारांची नोंदणीकरिता स्वतंत्र पोर्टल/ वेबसाईट निर्माण करण्यात येईल. ज्याद्वारे या योजनेची माहिती संपूर्ण उद्योजक, प्रशिक्षण संस्था, उमेदवारांना प्राप्त होईल. कौशल्य प्रशिक्षणाच्या आधारे उमेदवाराना रोजगार किंवा स्वयंरोजगार प्राप्त करून देण्यात येईल.

हे सर्वेक्षण भारतातील पहिले विकेंद्रीकृत, एआय आधारित वर्कफोर्स इंटेलिजन्स मॉडेल उभारत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असेल आणि यामधून एक अभिनव, स्वायत्त एआय मॉडेल विकसित केले जाईल. हे स्थानिक पातळीवरील कौशल्य, रोजगार आणि धोरणात्मक नियोजनासाठी दीर्घकालीन बुद्धिमत्ता संरचना निर्माण करेल.

या योजनेला जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर यांच्यामार्फत अनुदान दिले जाईल. तर जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर ही कार्यान्वयीन यंत्रणा असेल. या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत एच पश्चिम वार्ड मुंबई उपनगर येथील दरवर्षी पाच हजार प्रमाणे 2027 पर्यंत 15 हजार उमेदवारांचे विविध कौशल्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कौशल्य वृद्धी करुन रोजगार/ स्वयंरोजगार प्राप्त करुन देण्यात येईल. सर्वेक्षण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदाच करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.