हंसराज,प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- तालुक्यातील मोहगाव (देवी) येथे डीजे लावण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले आहे. ‘अपना बार’ जवळ दोन तरुणांवर चाकू आणि गुप्तीने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयुष श्रीधर बावणकर (२४, रा. मोहगाव देवी) आणि त्याचा मित्र कुणाल डोकरीमारे यांना आरोपी मैनेश बुधे (३०) व रामप्रकाश पेलने (२३) यांनी ३ मार्च २०२६ रोजी दुपारी १:२० च्या सुमारास ‘अपना बार अँड रेस्टॉरंट’ परिसरात बोलावले होते. मोहगाव येथे यापूर्वी नितीन साखरवाडे आणि नरेंद्र बांते यांच्यात डीजे लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादात कुणाल डोकरीमारे याने मध्यस्थी का केली, याच रागातून आरोपींनी हा हल्ला केला.
आरोपींनी फिर्यादी आयुष आणि कुणाल या दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू आणि गुप्तीने वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले असून, डॉक्टरी अहवालानंतर या हल्ल्याची भीषणता समोर आली आहे.
याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात आरोपी मैनेश बुधे आणि रामप्रकाश पेलने यांच्याविरुद्ध अप. क्र. १४२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी करीत आहेत.




