spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोहाडी जवळ भीषण अपघात: भरधाव क्रेटाच्या धडकेत तरुण ठार, दोन मित्र गंभीर जखमी

हंसराज,प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारने दुचाकीला समोरून दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ३ मार्च २०२६ रोजी दुपारी १:४५ ते २:०० वाजेच्या सुमारास मोहाडी-डाबरी रोडवरील पांडे ढाब्यासमोर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद पुरुषोत्तम कांबळे (४१, रा. तुमसर) यांचा भाऊ प्रशांत कांबळे हा त्याचे मित्र भूषण निगडे आणि विकास गोमासे यांच्यासह दुचाकीने (क्रमांक MH 36/AE-0967) जात होता. डाबरी रोडवर ७ किमी अंतरावर समोरून येणाऱ्या क्रेटा कारने (क्रमांक MH-35/AG-7117) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कार चालक सुनील गिरीधारीलाल बचवानी (३४, रा. गांधी वार्ड, तिरोडा, जि. गोंदिया) याने आपले वाहन भरधाव वेगाने व हयगयीने चालवून ही धडक दिली.

या अपघातात प्रशांत कांबळे याचा मृत्यू झाला, तर भूषण निगडे व विकास गोमासे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी भंडारा येथे हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने ते सध्या बयान देण्याच्या स्थितीत नाहीत. याप्रकरणी मृताचे भाऊ प्रमोद कांबळे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मोहाडी पोलिसांनी आरोपी कार चालक सुनील बचवानी याच्याविरुद्ध अप. क्र. १४१/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६(१), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार लांजेवार करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.