हंसराज,प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या पटांगणावर १ मार्च रोजी तुमसर तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीत तालुक्यातील विविध भागांतून गायी, म्हशी, शेळ्यांसह एकूण १९२ पाळीव प्राणी सहभागी झाले होते. यामध्ये कर्कापूरचे प्रगतशील शेतकरी दिलीप आगाशे यांच्या म्हशीने सर्वांचे लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.
आमदार राजु कारेमोरे यांच्या हस्ते उद्घाटन
या प्रदर्शनीचे उद्घाटन तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु कारेमोरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, जि.प. सदस्य सुषमा पारधी, राजू ढबाले, पंचायत समिती तुमसरच्या सभापती दीपिका गौपाले, उपसभापती सुभाष बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह पं.स. सदस्य दीपमाला भवसागर, आम्रपाली पटले, कांचन कटरे, सुशीला पटले, माजी सभापती पल्लवी कटरे, राजेश ठाकूर, मनोज झुरमुरे, मीनाक्षी सहारे, सिहोरा सरपंच सलाम शेख, मांडवीच्या सरपंच मनीषा ढबाले, चुलरडोहचे सरपंच छत्रपाल पारधी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे डॉ. विलास गाडगे आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तुषार पुंड यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जनावरांचे आरोग्य कसे टिकवून ठेवावे आणि पशुपालनातून आर्थिक प्रगती कशी साधावी, यावर त्यांनी उपयुक्त माहिती दिली. प्रदर्शनीत सहभागी सर्वच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. आशिष गटकळ (सिहोरा), डॉ. शुभम थोरात (हरदोली), डॉ. खुशवंत थोरात (देव्हाडी) आणि डॉ. बारापात्रे (नाकाडोंगरी) यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रदर्शनीला तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.








