spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्याच्या जलशुद्धीकरण केंद्रात घाण, ऑईल आणि मेलेले सरडे; खासदार डॉ. प्रशांत पडोळे आक्रमक

– भंडाऱ्यातील दूषित पाणी पुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले तात्काळ कारवाईचे पत्र; कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा शहरात मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या तक्रारींची गंभीर दखल घेत खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज शहरातील दसरा मैदान येथील जलशुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान केंद्राची अत्यंत भीषण अवस्था समोर आली असून, चक्क पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मेलेले सरडे आणि मशीनचे ऑईल मिसळत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

खासदार डॉ. पडोळे यांनी भेटीदरम्यान जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्यांची पाहणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती, लोखंडाचे कण आणि कचरा साचलेला दिसून आला. इतकेच नव्हे तर टाक्यांमध्ये मृत अवस्थेतील सरडे आणि भिंतींवर कोळीष्टके आढळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हेच दूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाशिवाय थेट शहराला पुरवले जात असल्याचे दिसून आले.

केंद्रातील मशिनरीची स्थितीही अत्यंत निकृष्ट असल्याचे खासदारांनी निदर्शनास आणून दिले. मशीनमधून ऑईल आणि ग्रीसची गळती होत असून ते पाणी थेट मुख्य साठवण टाकीत जात आहे. ज्या कंत्राटदाराने या केंद्राचे काम केले, त्याने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने यंत्रणेची कार्यक्षमता संपली असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले.

या गंभीर प्रकारानंतर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी, भंडारा यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात प्रामुख्याने खालील मागण्या मांडल्या आहेत:

🔹 दसरा मैदान जलशुद्धीकरण केंद्राची तातडीने संपूर्ण स्वच्छता व दुरुस्ती करावी.

🔹 यंत्रणेची तांत्रिक तपासणी करून ऑईल गळती तात्काळ थांबवावी.

🔹 संबंधित कंत्राटदाराच्या कामाची सखोल चौकशी करून त्यावर कायदेशीर कारवाई करावी.

🔹 शहराला शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी नियमित पाणी तपासणीची व्यवस्था उभारावी.

“नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी यावेळी दिला. या पाहणीमुळे नगरपालिका प्रशासन आणि संबंधित विभागाचे धाबे दणाणले आहेत.

Popular Articles