Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img
spot_img

मोर्शी तालुक्यातील उपविभागीय मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालय रामभरोसे ! 

मोर्शी, तालुका प्रतिनिधी :- पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या ड्राय झोनमधील मोर्शी तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना अत्यंत महत्त्व असतांना मोर्शी येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे कार्यालयामध्ये उपस्थित राहत नसल्यामुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे स्थानिक उप विभागीय संसंधारण कार्यालय मात्र सध्या रामभरोसे चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मोर्शी तालुक्यात मृद व जलसंधारणाच्या विविध योजना, नाले खोलकरण, शेततळी, नवीन बंधारे निर्मा करणे, बंधारे दुरुस्ती आणि पाणीसाठा वाढविण्याच्या कामांची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र मोर्शी उपविभागात अनेक ठिकाणी कामे रखडलेली असून नियोजनाचा अभाव आणि कामांवर योग्य देखरेख नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

मोर्शी तालुक्यात अनेक जलसंधारण कामांचे प्रस्ताव मंजूर होऊनही प्रत्यक्षात कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. काही ठिकाणी तर कामांची पाहणीसुद्धा होत नसल्याने पावसाचे पाणी साठवण्याच्या संधी वाया जात आहेत. परिणामी ड्राय झोन असलेल्या मोर्शी तालुक्यात सिंचनाची समस्या अधिक गंभीर होत आहे.

मोर्शी तालुक्यात उपविभागीय मृद व जलसंधारण विभाग कार्यालयामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांना भेटण्यासाठी सोमवार आणि शुक्रवार या दिवशी वेळेची निश्चिती केली असतांनी सुद्धा संबंधित अधिकारी कार्यालयामध्ये कधीच नसतात त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत असल्यामुळे संबंधित विभागाप्रती रोष निर्माण होतांना दिसत आहे.

ड्राय झोनमध्ये असलेल्या मोर्शी तालुक्यात जलसंधारण विभागाने अधिक सक्रिय होऊन प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यालयाच्या कामकाजाची चौकशी करून कामांमध्ये गती आणावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com