spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

म्युनिसीपल बॉँडमधून’ मनपा उभारणार 200 कोटी रुपये

– मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्याकडून स्थायी समितीला अर्थसंकल्प सुपूर्द

– सन 2025-26 या वर्षाचा सुधारित व 2026-27 चा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर

– लोकाभिमुख, पारदर्शक व गतीमान प्रशासन देण्याचा संकल्प – आयुक्त डॉ. विपीन

नागपूर :- नागपूर शहरात नाग नदी प्रदूषण निर्मुलन प्रकल्पासाठी मनपाचा हिस्सा उभारण्यासाठी मनपातर्फे 200 कोटी रुपये म्युनिसीपल बॉँडच्या (रोखे) माध्यमातून उभारणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मनपाचे 2026-27 या वर्षासाठीचा ५८४० कोटी ६५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करताना दिली. यावेळी आयुक्तांनी नागपूरच्या नागरिकांना पुढील आर्थिक वर्षात लोकाभिमुख, पारदर्शक व गतीमान प्रशासन देण्याचा तसेच नागपूरला नंबर एकची महानगरपालिका बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.

मनपाच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवार (ता.१३) डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, निगम सचिव डॉ रंजना लाडे यांच्यासह स्थायी समितीचे सर्व सदस्या स्वीटी किशोर भिसीकर, प्रमिला अजय गौर, विशाखा प्रकाश मोहोड,  निरंजना महेश पाटील, ममता ठाकूर, साधना बरडे, अभिरुची अनिल राजगिरे, शितल विजय रारोकर, सानवी रविंद्र तरुडकर (शेंडे), मानसी निखिल सिमले, मेरिस्टेला देवा उसरे, अभिजीत प्रभूकांत झा,  वसीम खान रहीम, अभिषेक शंभरकर, असलम खान मुल्ला उपस्थित होते. प्रारंभी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच स्थायी समितीच्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी नागपूर मनपाचा 2025-26 चा सुधारित अर्थसंकल्प व 2026-27 या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती यांना सुपूर्द केला. मनपा आयुक्तांनी आज 2025-26 चे 5 हजार 401 कोटी 62 लाख रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प व 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 5 हजार 857 कोटी 30 लाख रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. यात खर्चाच्या बाजूला 5 हजार 840 कोटी 65 लाख रुपयांची तरतूद केली आहे. मनपाचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा 16 कोटी 65 लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मनपा आयुक्तांनी सादर केला. या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने एकमताने मंजुरी प्रदान केली.

मनपाचे उत्पन्नाचे स्त्रोत

मनपाला उत्पन्नाच्या साधनांबाबत मनपा आयुक्तांनी काही विशेष बाबींचा विशेष उल्लेख केला. यात शासनाकडून मिळणार्या वस्तू व सेवा कर (जीएसटी)च्या माध्यमातून मनपाला 2026-27 या आर्थिक वर्षात 1913 कोटी 68 लाख रुपये मिळणार असल्याचे सांगितले. याशिवाय मालमत्ता कराच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत 375 कोटी येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय जलप्रदाय विभागाकडून पाणी कराच्या माध्यमातून 275 कोटी रुपये मिळेल तसेच नगरनगर रचना विभागातून 450 कोटी रुपयांचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

1926 कोटींचा नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प

शहराचा विकास करण्यासाठी केंद्र, राज्य व मनपाच्या सहाय्याने विविध विकास प्रकल्प राबविल्यात जात आहे. यासाठी मनपाला सुद्धा काही हिस्सा द्यावा लागतो. नाग नदी प्रदूष निर्मूलन प्रकल्प 1926 कोटी 99 लाख रुपयांचा आहे. यात 60 टक्के केंद्र सरकार, 25 टक्के राज्य सरकार निधी देणार आहे. यात मनपाला 15 टक्के म्हणजे 304 कोटी 41 लाख रुपयांचा निधी द्यावयाचा आहे. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प

हा प्रकल ्प पाच पॅकेजमध्ये प्रस्तावित केले आहे. हा प्रकल्प 8 वर्षात पूर्ण करावयाचा आहे. परंतु मनपा हा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला. यात 7 ठिकाणी पंपिंग स्टेशन, 92 दशलक्ष लिटर क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्र व 520 किमी अंतराची सिव्हर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

रोखे उभारणे मनपाच्या हिताचे

मनपाने निधी उभारण्यासाठी आता म्युनिसीपल बॉँडच्या माध्यमातून रोखे बाजारातून निधी उभारण्याचा संकल्प केला आहे. यात 200 कोटी रुपयांचा निधी रोख्यांच्या माध्यमातून उभारला जाईल. ही रक्कम तात्काळ द्यावी लागत नसल्याने मनपाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नाही. तसेच रोखे उभारण्यामुळे मनपास केंद्र शासनाकडून २६ कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त होणार असल्यामुळे कर्ज घेऊन निधी उभारण्यापेक्षा रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारून आर्थिक बोजा कमी पडेल , असेही त्यांनी सांगितले. ही प्रक्रिया येत्या 1 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प

अमृत योजना

अमृत टप्पा 1 व टप्पा २ अंतर्गत शहरात फिडर मेन लाईन, जलवाहिन्या टाकणे, तसेच ज्या ठिकाणी पाणी पुरवठा व्यवस्था नाही. त्या भागात जलवाहिन्या टाकण्याचे काम केले जाणार आहे. अमृत टप्पा 2 मध्ये पोहरा नदी प्रदूषण निर्मुलनाचा प्रकल्प राबविला जाणार आहे. यासाठी 957 कोटी 1 लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यता मिळाली असून, काम प्रगतीपथावर आहे.

घनकचरा व्यवस्थापन

भांडेवाडी येथील कचऱ्याचे ढिगारे एक वर्षात पूर्णपणे संपविण्यात येणार असून ढिगारे मुक्त भांडेवाडी करण्यात येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. जुन्या कचर्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन – 2 अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. या कामास सुरूवात झाली असून हे काम येत्या 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे.

सिमेंट क्रांकीट रस्ते टप्पा 4

शहर सिमेंट क्रांकीट रस्ते प्रकल्प टप्पा क्रमांक 4 अंतर्गत शहरात 300 कोटी रुपयांचे सिमेंटचे रस्ते बांधण्यात येणार आहे. यात 33 रस्ते पूर्ण होणार असून यात 23.45 किमी. लांबीचे रस्ते होणार आहे.

राजे रघुजी भोसले नगर भवन

महाल भागातील मनपाचे राजे रघुजी भोसले नगरभवन अद्यावत सुविधांसह लवकरच पूर्ण होणार आहे. जवळपास 6808 चौ. मी. क्षेत्रफळात 125 कोटी रुपये खर्च करून हे भव्य नगरभवन बांधले जात आहे. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या सूचनेप्रमाणे सेंट्रल विस्टा च्या धर्तीवर साऊंड सिस्टीम करण्याचे प्रस्तावित असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

रमाई घरकुल योजना

शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी रमाई घरकुल योजना राबविण्यात येत आहे. यात आतापर्यंत 1587 लाभार्थींना घरकुल देण्यात आले आहे. यासाठी 2026-27 या वर्षात 30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

जिजाऊ स्मृती शोध संस्थान

महिला सशक्तीकरण व सबलीकरणासाठी महिला उद्योजकांकरिता मार्केटिंग हब व एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी 17 कोटी 42 लाख रुपये रकमेस शासनाने मान्यता दिली आहे.

क्लिन स्ट्रीट फूड हब

नागरिकांना स्वच्छ स्ट्रीट फूड उपलब्ध करून देण्यासाठी सोमलवाडा परिसरात क्लिन स्ट्रीट फूड हब उभारण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प

हा प्रकल्प वर्धा रोड़ ते जयताळा या दरम्यान 30.58 हेक्टरवर साकारला जात आहे. नियोजनबद्ध व टप्प्याटप्प्याने 24 स्वतंत्र भूखंडामध्ये विभाजन करण्यात आले आहे. 5 वर्षात 600 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. मनपावर कोणताही आर्थिक बोजा न टाकता आतापर्यंत मनपाला 80 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. हा प्रकल्प पूर्णत्वात गेल्यानंतर मनपाला 2500 कोटी रुपयांचा उत्पन्न मिळण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली.

75 उद्याने व 75 मैदाने

मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरात 75 थीम बेस्ड उद्याने तसेच सर्व सुविधा असलेल्या 75 मैदानांचा विकास केला जाणार आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पात उद्यान विभागासाठी 90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

देवडीया हॉस्पिटल

आरोग्य अभियान अंतर्गत (एनयूएचएम) क्वेटा कॉ़लनीत जुन्या देवडीया दवाखान्याच्या जागेवर नवीन दवाखाना उभारण्यात येणार आहे. यामुळे लकडगंज व इतवारीतील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळेल. यासाठी प्रकल्पाला 35.86 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वांजरा येथे 480 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नारी, पुनापूर व जयताळा भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांसाठी सदनिका बांधण्यात येणार आहे. यात नारीभागात 518, पुनापूर येथे 840 तर जयताळा भागात 571 सदनिकांचे बांधकाम होणार आहे.

शाळांमध्ये सीसीटीव्ही

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन शाळा बांधणे, शाळांच्या अभिलेखांचे डीजीटायझेशन करणे या सर्व बाबींसाठी शिक्षण विभागासाठी या अर्थसंकल्पात 138 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अग्निशमन व आणिबाणी सेवा विभाग

नागपूर शहराचा विस्तार लक्षात घेऊन शहरातील अग्निशमन केंद्रात वाढ करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शहरात 22 अग्निशमन केंद्रे उभारण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. .या विभागात नवीन यंत्रसामुग्री खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे पदभरती केली जाणार आहे. या विभागासाठी 93 कोटी 35 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका

मनपाच्या पदभरतीत किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये नागपूर व परिसरातील उमेदवारांचा टक्का कमी राहत असल्याने ही उणीव भरून काढण्यासाठी मनपातर्फे ई-ग्रंथालये व त्यात अभ्यासिकामध्ये यूपीएससी, एमपीएससीतर्फे घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. ग्रंथालय विभागासाठी या अर्थसंकल्पात 22 कोटी 44 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.