spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोगस प्रमाणपत्र प्रकरणी हिंगोलीतील शाळेविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई :- हिंगोली जिल्ह्यातील विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मराठी माध्यमाच्या शाळेने चुकीची माहिती देऊन शासनाकडे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधित शाळेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.

हिंगोली जिल्ह्यातील विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल, कोळसा शाळाही मराठी माध्यमाची असताना इंग्रजी माध्यम सुरू केल्यासंदर्भात सदस्य तानाजी मुटकुळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले. या चर्चेत सदस्य बाबासाहेब देशमुख, प्रशांत बंब, संजय कुटे यांनी सहभाग घेतला.

मंत्री सावे म्हणाले, की इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा योजना चालवली जाते. संबंधित संस्थेने मराठी माध्यमाची शाळा इंग्रजी माध्यमाची असल्याचे दाखवत कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून प्रमाणपत्र सादर केले होते. याबाबत तक्रार आल्यानंतर विभागाने तपासणी केली. तपासणीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत मोठी तफावत आढळली. या प्रकरणी संबंधित शाळेला नोटीस देण्यात आली असून इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आयुक्तालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती शाळेची मान्यता रद्द करण्यासह बोगस प्रमाणपत्र देऊन घेतलेला शासनाचा निधी वसूल केला जाईल आणि फौजदारी गुन्हाही दाखल केला जाईल, असे मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. आयुक्तालयाच्या संचालकांना १५ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले. संबंधित शाळेत शिकणारे विद्यार्थी असल्यास त्यांना हिंगोली जिल्ह्यातील दुसऱ्या इंग्रजी माध्यम निवासी शाळेत स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील जालना व बीडसह इतर भागांतील अशा २३ शाळांवर आधीच कारवाई करण्यात आली आहे. पूर्ण पडताळणी होईपर्यंत यंदा कोणत्याही नवीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली नाही, असेही मंत्री सावे यांनी सांगितले.

Popular Articles