spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दैनिक महासागर कर्मयोगी पुरस्कार २०२६ सोहळा २१ मार्चला नागपुरात

– डॉ. रवींद्र क्षीरसागर- डॉ. उर्मिला क्षीरसागर, मोरेश्वर बडगे, अनुप श्रीवास्तव आणि नागेश पाटील यांचा होणार सन्मान

नागपूर :- गेल्या ५६ वर्षापासून प्रकाशित होत असलेल्या दैनिक महासागर तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित महासागर कर्मयोगी पुरस्कार २०२६ सोहळ्याचे आयोजन शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सीताबर्डी येथील माहेश्वरी भवन, टेकडी मार्ग येथील एसी सभागृहात करण्यात आले आहे. १९७१ साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या दैनिक महासागरने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली आहे. सध्या महासागरच्या १४ स्तंभ आवृत्त्या प्रकाशित होत असून Nagpur Post हे इंग्रजी दैनिक व युवाराष्ट्र दर्शन हे मराठी दैनिकही महासागर परिवाराचा भाग आहेत. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी महासागर तर्फे दरवर्षी चार विशेष कर्मयोगी पुरस्कार प्रदान केले जातात. प्रत्येक पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. यावर्षी वैद्यकीय सेवा क्षेत्रात डॉ. रवींद्र क्षीरसागर व डॉ. उर्मिला क्षीरसागर, पत्रकारिता क्षेत्रात ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर बडगे, कला क्षेत्रात ज्येष्ठ कलावंत व लेखक अनुप श्रीवास्तव तसेच समाजसेवा क्षेत्रात जिव्हाळा वसुंधरा परिवारचे नागेश पाटील यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माहिती व जनसंपर्क संचालक गणेश मुळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून अमरीष घटाटे अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तसेच दशसहस्त्रेषु विद्वत्रत्न डॉ. वेदप्रकाश मिश्रा अध्यक्षीय अभिभाषण करणार आहेत. या सन्माननीय व्यक्तींची निवड एका विशेष समितीमार्फत करण्यात आली आहे. समितीमध्ये दैनिक महासागरचे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, उमाशंकर लाल, संदीप काळे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रभाकर दुपारे, जयपाल बाबरिया, राहुल चांडक, पंकज चांडक, विशाल चांडक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रवीण डबली, कमल नामपल्लीवार आणि हरेष निमजे यांचा समावेश होता. नागपूरकरांनी या सोहळ्यास उपस्थित राहून या प्रेरणादायी क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles