कामठी :- वडोदा पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत एका मोठ्या टँकर चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंशुमनकुमार सुरेश तिवारी (वय २८, रा. नागपूर) यांनी तक्रार दिली होती की, २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी त्यांच्या ‘एस एस बिल्ड कॉम’ सिमेंट प्लांटवरून त्यांचा टँकर (क्र. MH 31 CQ 7353) चोरीला गेला होता. या तक्रारीवरून वडोदा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवले. तपासादरम्यान पोलिसांना आरोपी तीलोचन बल्लूराम कुमार (वय ३०, रा. छत्तीसगड) याच्याबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी नागपूरच्या इतवारी भागातून त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने टँकर चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी टँकर क्रमांक: MH 31 CQ 7353
एकूण किंमत: २५,००,०००/- रुपये (पंचवीस लाख) ताब्यात घेतले.








