– जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांचे निर्देश
नागपूर :- नागपूर शहरात उन्हाळ्याच्या काळात नागरिकांना पाण्याची समस्या येऊ नये आणि वाढीव पाणी बिलांपासून दिलासा मिळावा, या उद्देशाने जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात (ता.25) आढावा बैठक पार पडली. बैठकीत सभापती धुरडे यांनी नागरिकांना मिळालेली पाच पट वाढीव देयके पूर्ववत करून नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूला दिले.
या बैठकीला उपसभापती विजय (पिंटू) झलके, नगरसेवक योगेश पाचपोर, रामदास शाहू, सचिन नाईक, शेषराव गोतमारे, नगरसेविका तसनीम परवीन नियामत खान ताजी, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्रीकांत वायकर यांच्यासह मनपाचे उपअभियंता आणि ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कार्यकारी अभियंता श्रीकांत वायकर यांनी जलप्रदाय विभागाचे सादरीकरण केले. शहरात एकूण 109 पाण्याच्या टाक्या असून त्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. नागपूरला शहराला पेंच प्रकल्प, कन्हान नदी, नवेगाव खैरी आणि गोरेवाडा तलाव येथून पाणी पुरवले जाते असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सभापती दिव्या धुरडे यांनी 2022 ते 2025 या कालावधीतील कामांचा आढावा घेत 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. सभापती श्रीमती धुरडे यांनी शहरात होणारी जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्यात यावे, दूषित पाणीपुरवठ्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करीत ही समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देश त्यांनी दिले. उन्हाळा लक्षात घेता शहरातील बोरवेल दुरुस्त कराव्यात, सार्वजनिक विहिरींचा गाळ काढून त्या स्वच्छ कराव्यात आणि नागरिकांना वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना मिळालेली पाच पट वाढीव देयके पूर्ववत करून नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश त्यांनी ओसीडब्ल्यूला दिले. शहरातील सर्व पाण्याचे 5 वर्ष जुने व नादुरुस्त मिटर तात्काळ बदलविण्याचे निर्देश दिले. उन्हाळयात नागरीकांना योग्य तो पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीने ओसीडब्ल्यू ला र्निदेश दिले.
उपसभापती विजय झलके यांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलवाहिनीवर फ्लोमीटर लावण्याच्या सूचना केल्या. तसेच लॉन, मंगल कार्यालये आणि वॉटर कॅन पुरवठादारांनी व इतरांनी घेतलेल्या अवैध नळ जोडण्या शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. वाढीव बिलांच्या तक्रारी निवारण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये विशेष कक्षाची स्थापना करून तिथे अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले. याशिवाय नगरसेवक सचिन नाईक यांनी रस्त्यावरुन जलवाहिनी टाकल्यानंतर पुर्नभरण योग्य रित्या करण्यात यावे अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.








