किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत गांगणेर (हिवरा) अंतर्गत येणाऱ्या हिवरा शिवारात मंगळवार (ता. 24 मार्च)ला दुपारी दोन च्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याने हिवरा येथील शेतकरी विजय मेश्राम यांच्या आठ एकरातील गहू तर तारसा येथील शेतकरी नरेश हटवार यांच्या दहा एकरातील कापणीला आलेला गहू पीक पूर्णपणे जळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे हिवरा येथील शेतकरी अन्ना गणवीर यांनी आज बुधवार (ता. 25 मार्च) ला घटनास्थळी भेट दिली असता सांगितले. संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून सर्वच बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी हिवरा येथील सामाजिक कार्यकर्ते लेखराम गणवीर यांनी केले आहे. अल्ट्राटेक कंपनी, एनटीपीसी व कन्हान नगर परिषद येथील अग्निशमन दल यांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने व मधोमध रेल्वे ट्रॅक आल्याने इतर शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक जळण्यापासून वाचल्याचे हिवरा येथील ग्रामस्थांनी सांगितले.
तोंडली, इंदोरा, वाकेश्वर व कोदामेंढी येथेही मंगळवारला दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून शेतकऱ्यांच्या गहू पिकाचे नुकसान झाल्याचे तोंडली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बाबरे, कोदामेंढी येथील साईबाबा पतसंस्थेचे संचालक प्रकाश बावनकुळे यांनी सोशल मीडियावर गहू पीक जळाल्याचे फोटो व व्हिडिओ टाकून संबंधित विभागाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी भ्रमणध्वनीवरून तोंडी व लेखी तक्रार दिल्याचे सांगितले.