spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रशासनाचा दावा फोल! भंडारा-गोंदियात इंधन व गॅसचा तीव्र तुटवडा; खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली पाहणी

– अधिकारी म्हणतात टंचाई नाही, मात्र पेट्रोल पंपावर लागले ‘नो स्टॉक’चे बोर्ड; नागरिकांची प्रचंड पायपीट

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकारी जिल्ह्यात कोणतीही टंचाई नसल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी स्वतः विविध पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सींना भेटी देऊन पाहणी केली, असता प्रशासनाचा खोटेपणा उघड झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल, डिझेल उपलब्ध नाही’ असे फलक झळकत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर वनवन भटकावे लागत असून, त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गॅस एजन्सींना भेट दिली असता, तिथे मोठी गर्दी पाहायला मिळाली. कित्येक अपंग व्यक्ती सिलिंडरसाठी रांगेत ताटकळत उभे होते. मात्र, गॅस एजन्सीकडून त्यांना ‘उद्या या’ असे सांगून रिकाम्या हाती परत पाठवले जात होते. ही गंभीर बाब पाहून डॉ. पडोळे यांनी संताप व्यक्त केला. “अशा अपंग व्यक्तींना रांगेत उभे न करता त्यांना घरपोच गॅस सिलिंडरचा पुरवठा करा,” असे कडक निर्देश त्यांनी यावेळी एजन्सी चालकांना दिले.

या भीषण टंचाईबाबत डॉ. पडोळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा केली. “जिल्ह्यातील अधिकारी इंधन टंचाई नसल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. परंतु प्रत्यक्ष ग्राऊंड झिरोवर परिस्थिती वेगळी आहे. जनतेला सत्य आणि पारदर्शक माहिती देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

इंधन आणि गॅसच्या या टंचाईमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाने समन्वय साधून इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांचे हाल थांबणार नाहीत, असा इशाराही खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles