– ३ लाख ५१ हजारांची जंगी लूट, शेतकरी आणि ग्रामीण खेळांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश.
खापा, वार्ताहर :- मागील काही वर्षापूर्वी शासनाने शेतकऱ्यांचा मैदानी खेळ बैलगाडा शंकर पट यावर बंदी घातली होती. त्यानंतर कोविड काळात हा बंद होता. मात्र, मागील दोन तीन वर्षापूर्वी माजी मंत्री सुनील केदार यांनी राज्य सरकारकडे आणि खासदार अमोल कोल्हे केंद्र सरकारकडे ठामपणे ही बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी मागणी केली. यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नाने या खेळाला परत परवानगी मिळाली.
खापा शहरात शेतकरी आणि ग्रामीण खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘भव्य जंगी शंकर पट’ प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैलगाडा भव्य जंगी शंकरपट दि. ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत घरकुल कॉलनी, शिवाजीनगर खापा येथे होणार आहे. या पट स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड व समस्त शेतकरी व गावकरी मंडळी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे, समस्त शेतकरी व नगरवासी उपस्थित राहणार आहे.
तर, विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यतीसाठी इतर मान्यवरांच्या कडून या स्पर्धेसाठी तीन लाख ५१ हजाराची जंगी लूट केली आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये रोख असून विविध गटात वेग वेगळे रोख पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. ही पट स्पर्धा जनरल गट, तहसिल गट ( सावनेर, कळमेश्वर), गाव गट अश्या तीन गटात होणार असून बिना तुतारी हा पट होणार आहे. इलेक्ट्रिक घडीचे संचालन मनोहर धोटे, विजय आकरे (निळगाव) करणार आहे. या स्पर्धेदरम्यान काडी पुरानी बंद, खो बंद, जिवीत्वाची जबाबदारी ज्याची त्यावर राहणार आहे. यात पंचकमिटी यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. सर्वच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार नियमात राहून अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.
या शंकरपटात तालुक्यासह, नागपूर जिल्ह्यातील आणि विदर्भातील अनेक बैलजोड्या सहभागी होणार आहेत. शंकरपट प्रेमींनी या तीन दिवसीय शंकरपटाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे. आयोजकांच्या अनुसार अश्या प्रकारचे आयोजन पारंपरिक खेळ, ग्रामीण संस्कृतीला जिवंत ठेवण्याचे आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढवण्याचे काम करते.
या स्पर्धचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष लकी प्रायकर, उपाध्यक्ष सचिन आकरे, सचिव सतिश (बंडू) सुरकार, सहसचिव हिमांशू पांडे, कोषाध्यक्ष सुरज शेंडे, सहकोषाध्यक्ष पंकज अगडे आणि सदस्य तसेच शेतकरी, व्यापारी मित्र मंडळ व समस्त नगरवासी यांच्या सहकार्यातून होत आहे. या स्पर्धेत शेतकरी, स्थानिक नागरिक, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहणार आहे.








