spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

परशुराम घाटातील कामांना वेग; १५ एप्रिलपर्यंत गॅबियन वॉल पूर्ण करण्याचे लक्ष्य

चिपळूण :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत चिपळूण हद्दीतील रखडलेल्या कामांना अखेर वेग आला असून परशुराम घाटात गॅबियन वॉल उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदार कंपनीला देण्यात आल्या आहेत.

कोकणातील महत्त्वाचा मानला जाणारा ५.४० किलोमीटर लांबीचा परशुराम घाट हा चौपदरीकरण प्रकल्पात चिपळूण व खेड अशा दोन टप्प्यांत विभागण्यात आला आहे. मात्र घाटातील तोडफोडीपासूनच या कामात अनेक अडथळे निर्माण झाले. कामादरम्यान अपघातही घडले, तर वारंवार होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे संरक्षण भिंतींची सुरक्षितता धोक्यात आली.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (टीएचडीसीएल) या संस्थेने घाटाचा अभ्यास करून उपाययोजना सुचवल्या. त्यानुसार कोट्यवधींच्या निविदेद्वारे डोंगराला जाळी बसविणे आणि गॅबियन वॉल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. गतवर्षी पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र मे महिन्यातच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कामाचा बोजवारा उडाला. अर्धवट अवस्थेतील गॅबियन वॉल अनेक ठिकाणी कोसळल्याने काम थांबवावे लागले आणि घाटात एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

‘व्हाया डक्ट’ पुलाचा प्रस्ताव

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा-खंडाळा घाटाच्या धर्तीवर परशुराम घाटात ‘व्हाया डक्ट’ पुलाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या एजन्सीद्वारे अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर केला जाणार असला, तरी त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तत्पूर्वी गॅबियन वॉलचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

– पंकज गोसावी, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण

Popular Articles