Wednesday, April 22, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रोज उडता तीर अंगावर घेण्याची संजय राऊत यांना सवय

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई :- रोज उठून उडता तीर अंगावर घ्यायचा ही संजय राऊत यांची सवय आणि धंदा आहे. महिला आरक्षणाबाबत भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही महिलांचा आणि नारी शक्तीचा अपमान करताहात. या महिलांचा बाण एकदा सुटला तर तुमची पळता भुई थोडी होईल. विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. तो बाण कसा घुसला, ती कट्यार कशी काळजात घुसली हे एकदा संजय राऊत यांनी पाहून मग लाडक्या बहिणीचा अपमान करावा, असा घणाघात नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत  बन बोलत होते.

देवेंद्र फडणवीस कुठल्या गटात आहेत हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये, असे फटकारत बन म्हणाले की भाजपाचा एकच गट आहे तो म्हणजे ‘भारतमाता की जय’ म्हणणारा. प्रत्येकजण भाजपा गटात आहे. उबाठा गटात एक म्हणतो पाकिस्तान झिंदाबाद, दुसरा म्हणतो सोनिया गांधी झिंदाबाद, तिसरा म्हणतो राहुल गांधी झिंदाबाद तर चौथा म्हणतो प्रियंका चतुर्वेदी झिंदाबाद. ही गटबाजी उबाठा गटात असल्याने त्यांनी आपल्या गटबाजीकडे लक्ष द्यावे भाजपाकडे पाहू नये.

रोहित पवार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडत बन म्हणाले 2023 साली जेव्हा महिला आरक्षण विधेयक आले होते तेव्हा रालोआकडे स्पष्ट बहुमत असल्याने नाईलाजाने तुम्ही पाठिंबा दिलात. त्यावेळेला त्यात अट होती की जेव्हा जनगणना आणि डीलीमिटेशन होईल तेव्हा हे महिला आरक्षण विधेयक लागू होईल. मोठे सादरीकरण दिल्यानंतर आपणच खरे असल्याचा निरर्थक दावा तुम्ही करताय तो सपशेल खोटा आहे. महिला आरक्षणाविरोधात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या पक्षाने भूमिका घेतली त्याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार आहात? त्या भूमिकेबद्दलही महाराष्ट्राला सादरीकरण दाखवा आणि दाखवणार नसाल तर आमचीही एक सादरीकरण दाखवायची तयारी आहे. ती ऐकायची तुमची तयारी आहे का? असा प्रहार बन यांनी केला.

जामखेडमध्ये आपण पंधराशे मतांनी निवडून आलात याचा आधी विचार करा आणि असे भलेमोठे पावरपॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्याऐवजी वास्तव काय आहे ते पहा. ज्या पद्धतीने लोकसभेत तुमच्या पक्षाने काँग्रेसच्या नादी लागून नारी शक्तीचा अपमान केला, महिला विधेयकाचा अपमान केला आणि विधेयक मंजूर होऊ दिले नाही त्याचे उत्तर आधी रोहित पवारांनी दिले पाहिजे. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी, महाराष्ट्रातली नारीशक्ती पुन्हा एकदा रोहित पवार यांच्या पक्षाला आणि रोहित पवारांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे बन यांनी सुनावले.

2029 ची मॅच भाजपा आणि रालोआ ऑनलाईन जिंकणारच आहे. त्यासाठी अशा पद्धतीची रणनीती करायची गरज नाही. 2019 ला आम्ही जिंकलो होतो. 2024 लाही आम्ही जिंकलो आणि 2029 लाही पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात पुन्हा आम्ही जिंकू. स्वतःला विश्वगुरू कोण म्हणून घेतात त्याचा विचार रोहित पवार यांनी केला पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष सांगतो की आम्ही महाराष्ट्रात महिला आरक्षण लागू केले. मग रोहित पवार यांनी महिला आरक्षण विधेयकाला का विरोध केला याचे उत्तर आधी महाराष्ट्राला द्यावे, असे बन म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com