नागपूर :- समता, न्याय आणि बंधुत्वाचा विचार जनमानसात रुजवणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 199 वी जयंती या निमित्ताने नागपूर येथील महावितरण व महापारेषण परिमंडळाच्या वतीने भव्य ‘संयुक्त जयंती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रख्यात पत्रकार व विचारवंत संजय आवटे यांच्या प्रमुख व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, त्यांच्या प्रबोधनातून महामानवांच्या विचारांचा जागर होणार आहे.
गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता गड्डीगोदाम येथील महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ प्रांगणात पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वीज क्षेत्रातील दोन्ही प्रमुख कंपन्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संजय आवटे हे आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन करतील. मराठी वृत्तपत्रसृष्टीतील एक दिग्गज नाव असलेल्या आवटे हे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. राजकीय विश्लेषण, माध्यम नैतिकता आणि घटनात्मक मूल्ये यावर त्यांचे मोठे प्रभुत्व आहे. विशेषतः ‘आम्ही भारताचे लोक’ ही संविधानात्मक संकल्पना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर ते अभ्यासपूर्ण भाष्य करणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद महावितरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतिश अणे आणि म.रा.वि.मं. होल्डिंग कंपनीचे मुख्य अभियंता राकेश जनबंधू यांची विशेष उपस्थिती असेल.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती’ने या कार्यक्रमास महावितरण व महापारेषणमधील सर्व अधिकारी, अभियंता, कार्यालयीन कर्मचारी, सर्व वीज कामगार संघटनांचे पदाधिकारी, सभासद तसेच महिला प्रतिनिधींनी आपल्या सहपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.