– आयपीएस रॉबिन बन्सल यांचे स्पर्धा परीक्षार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन
Ø ‘युवा संवाद‘ उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
Ø २७ एप्रिलला तहसीलदार हेमकृष्णा पिसदे यांचे युपीएससी व एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन
यवतमाळ :- केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेची यश मिळविण्यासाठी ‘माझी निवड होणारच’ या आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी करा, असा प्रेरणादायी मुलमंत्र भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस रॉबिन बन्सल यांनी स्पर्धा परीक्षार्थींना ‘युवा संवाद’ कार्यक्रमात दिला.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने तरुणांना स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शनासाठी २१ एप्रिलपासून ‘युवा संवाद’ उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आले असून या त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, प्रमुख मार्गदर्शक व पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस रॉबिन बन्सल, उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, मुख्यमंत्री फेलो कुणाल पाटील, विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी आणि स्पर्धा परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.![]()
खासगी कंपनीत नोकरी ते आयपीएस
प्रमुख मार्गदर्शक आयपीएस रॉबिन बन्सल यांनी त्यांचा अनुभव विषद करतांना सांगितले की, ते पूर्वी सॅमसंग या खासगी कंपनीत सॅाफ्टवेअर इंजिनिअर पदी नोकरी करायचे, ते काम करत त्यांनी युपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. परंतू, नोकरी करत परीक्षेच्या तयारीला अपूरा वेळ मिळत असल्याने त्यांनी कंपनीची नोकरी सोडून सिव्हील सर्विसेसची तयारी केली आणि यश संपादन केल्याचे सांगितले. यास मार्गदर्शनात त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या सिव्हील सर्विसेस परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. यात त्यांनी युपीएससी परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, विषयांची निवड, पुस्तकांची निवड, प्रश्न पद्धती, मुलाखतीची पूर्वतयारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी व व्यवहार आणि सुरक्षा यांचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास, स्टडी मटेरिअल, ॲानलाईन अभ्यास सुविधांचा वापर आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) चा वापर कसा करायचा तसेच निवड झाल्यानंतरच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर तुमचे ध्येय स्पष्ट असले पाहिजे. युपीएससी परीक्षांसाठी किमान दोन वर्ष लागतात. परीक्षेची तयारी करतांना ‘माझी निवड होणारच’ ही भावना मनात असली पाहिजे. याशिवाय परीक्षेत निवड न झाल्यास प्लॅन बी तयार असला पाहिजेत.![]()
मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारीला लागा – जिल्हाधिकारी
यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनीही मार्गदर्शन करुन ‘युवा संवाद’ उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी मेहनत करावी लागेल. परीक्षेची तयारी कशी करायची याची माहिती या उपक्रमातून दिली जात आहे. युपीएससी व एमपीएससी परीक्षा कठीण झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत गांभीर्य असले पाहिजे. जिद्द, मेहनत, सातत्य आणि शिस्तीने परीक्षेची तयारी करावी, मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासून तयारीला सुरुवात करा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी करुन प्रोत्साहित केले.
या युवा संवाद कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात प्रश्नोतराच्या सत्रातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
२७ एप्रिलला तहसीलदार हेमकृष्णा पिसदे यांचे युपीएससी व एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘युवा संवाद’ उपक्रमाची सुरुवात झाली असून पुढील १ जून पर्यंत दर आठवड्याच्या सोमवारी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार २७ एप्रिल रोजी तहसीलदार हेमकृष्णा पिसदे यांचे युपीएससी व एमपीएससी परीक्षा विषयी मार्गदर्शन होक्षार आहे.
या कार्यक्रमाला स्पर्धा परिक्षार्थींनी उपस्थिती राहून लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.