– आरसीईआरटी चंद्रपूरमध्ये ‘रॉकेट मेकिंग कार्यशाळा’ उत्साहात
– विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष रॉकेट निर्मितीचा अनुभव; अवकाश तंत्रज्ञानाची सखोल ओळख
चंद्रपूर :- विज्ञान-तंत्रज्ञानाच्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या युगात विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी झेप देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली “रॉकेट मेकिंग कार्यशाळा” ही संकल्पना चंद्रपूरमध्ये प्रत्यक्षात उतरली. “आकाशाला गवसणी घालण्याची पहिली पायरी!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, संशोधन व तंत्रज्ञान (आरसीईआरटी), चंद्रपूर येथे हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, संशोधन व तंत्रज्ञान (आरसीईआरटी), चंद्रपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाने प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यशाळेला महाविद्यलयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २१ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर विज्ञानमय वातावरणाने भारावून गेला होता.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्य संरक्षक विनोद दत्तात्रेय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे, आयडीवायएम फाउंडेशनचे संस्थापक व प्रमुख अतिथी इंजि. रवी शंकर कुमार, तसेच MIDC असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. आर. के. कृष्णा, विभागप्रमुख (ईसीई) यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे तांत्रिक कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्य संरक्षक विनोद दत्तात्रेय यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित होणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
या कार्यशाळेसाठी आयडीवायएम फाउंडेशनचे संस्थापक इंजि. रवी शंकर कुमार यांनी प्रमुख अतिथी व प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना रॉकेटची रचना (डिझाइन), कार्यपद्धती, प्रक्षेपण प्रक्रिया तसेच सुरक्षेचे नियम यांचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रॉकेट तयार करण्याचा अनोखा अनुभव मिळाला आणि त्यांचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला.
यावेळी MIDC असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उद्योग आणि तंत्रज्ञान यांचा परस्पर संबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी नव उपक्रमाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ. आर. के. कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अंजुम कुरेशी, डॉ. पी. संगीथा व प्रा. राजेश भुते यांनी समन्वयक म्हणून उत्कृष्ट नियोजन केले.
या कार्यशाळेत महाविद्यलयातील सगळ्या विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतः रॉकेट तयार करून त्याची रचना, कार्यपद्धती व प्रक्षेपण प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली. या अनुभवामुळे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ झाली असून, भविष्यातील संशोधनासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ताहला खान, जॅड अली, अयान शेख, प्रियांशु कुमार, साक्षी मौऱ्या, रुचिता चौथाळे व अयान बल्की या विद्यार्थी समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन डॉ. अंजुम कुरेशी (स्टाफ समन्वयक) यांनी केले.एकूणच, “रॉकेट मेकिंग कार्यशाळा” हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, कौशल्यविकासक आणि प्रेरणादायी ठरला असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन ते भविष्यात देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.