– नागपूरच्या व्यावसायिकाची फसवणूक; एफसीआय टेंडरचे आमिष दाखवून हडपली रक्कम
हंसराज,भंडारा लाखनी :- लाखनी तालुक्यातील राजेगाव (एम.आय.डी.सी.) परिसरात राईस मिल विक्रीच्या व्यवहारात नागपूर येथील एका व्यावसायिकाची १ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
वामन माधवराव सोरते (५४, रा. माकडे लेआउट, भांडे प्लॉट चौक, नागपूर) असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रीहरी शामरावजी पाटील (७०), प्रमोद श्रीहरी पाटील (३८) आणि शांताराम बाळू डाकमोळकर (६६, सर्व रा.नागपूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर २०२४ पासून या फसवणुकीच्या प्रकरणाला सुरुवात झाली. आरोपींनी फिर्यादी वामन सोरते यांना राजेगाव एमआयडीसी येथील ‘एकदंत राईस मिल’ प्लॉटसह विक्री करण्याचे आमिष दाखवले. ही मिल ४ टन क्षमतेची असल्याचे आणि या मिलला ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे (FCI) मिलिंग टेंडर मिळवून देण्याचे खोटे आश्वासन आरोपींनी दिले होते. यावर विश्वास ठेवून सोरते यांनी आरोपींशी करार केला आणि त्यांना वेळोवेळी चेक व आरटीजीएस (RTGS) द्वारे एकूण १ कोटी रुपये दिले.
काही काळानंतर आपली फसवणूक झाल्याचे सोरते यांच्या लक्षात आले. आरोपी श्रीहरी पाटील आणि प्रमोद पाटील यांनी सोरते यांच्याकडून घेतलेल्या १ कोटी रुपयांचा वापर स्वतःचे वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी केला. जेव्हा सोरते यांनी आपली रक्कम परत मागितली, तेव्हा आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तिसरे आरोपी शांताराम डाकमोळकर यांना या सर्व गैरप्रकाराची माहिती असूनही त्यांनी ती फिर्यादीला दिली नाही आणि फसवणुकीस मदत केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वामन सोरते यांनी या प्रकरणाची तक्रार लाखनी पोलीस स्टेशनमध्ये दिली. चौकशीअंती पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा (अ.क्र. २०७/२०२६) दाखल केला
आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखनी पोलीस करत आहेत. या मोठ्या रकमेच्या फसवणुकीमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

