spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकन प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली :- पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकन/ शिफारसी मागवण्याची प्रक्रिया 15 मार्च 2026 पासून सुरु झालेली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 ही आहे. ही नामांकने/शिफारसी केवळ ऑनलाईन स्वरूपात, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवरुन https://awards.gov.in स्वीकारली जाणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (26 जानेवारी 2027) हे पुरस्कार जाहीर केले जातील.

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणीत दिले जाणारे हे देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. 1954 साली पहिल्यांदा देण्यात आलेले हे पुरस्कार, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला जाहीर केले जातात. विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांना ह्या पुरस्कारांनी गौरवण्यात येते . कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार व उद्योग अशा सर्व क्षेत्रांतील विशेष उल्लेखनीय कामगिरी किंवा सेवा यासाठी हा सन्मान दिला जातो. डॉक्टर्स आणि वैज्ञानिक वगळता, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी मात्र, या पुरस्कारांसाठी पात्र नसतात.

पद्म पुरस्कारांना ‘सर्वसामान्यांचे पद्म पुरस्कार’ बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना नामांकन किंवा शिफारसी करण्याचे, तसेच स्वतःचे नामांकन करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती व जमाती, दिव्यांग व्यक्ती तसेच एकूण समाजासाठी निःस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत, हे कार्य समाजापुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येते.

वर उल्लेख केलेल्या पोर्टलवर दिलेल्या आराखड्यात, संबधित व्यक्तीची सविस्तर माहिती, त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात/शाखेत त्यांनी केलेली विशेष उल्लेखनीय सेवा/कामगिरी यांचा स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख नामांकन/शिफारसी मध्ये केलेला असावा. तसेच संबंधित व्यक्तीने आपल्या क्षेत्रात केलेली विशेष व उल्लेखनीय कामगिरी किंवा सेवा स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.

यासंबंधी अधिक माहिती गृह मंत्रालयाच्या https://mha.gov.in या संकेतस्थळावरील “Awards and Medals” या विभागात तसेच पद्म पुरस्कार पोर्टलवर https://padmaawards.gov.in उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित नियम व अधिनियम खालील लिंकवर पाहता येतील: https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx .

Popular Articles