भंडारा :- भंडारा शहर हद्दीत ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्यातील घर गणना आणि घर यादी तयार करण्याच्या कामाला १६ मे पासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा या राष्ट्रीय मोहिमेसाठी पूर्णपणे सज्ज झाली असून, यावेळची
जनगणना संपूर्णपणे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असेल. प्रगणक आणि पर्यवेक्षक ‘HLO’ या मोबाईल ॲपद्वारे घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. प्रत्यक्ष गणनेपूर्वी नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत विशेष संधी देण्यात आली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राहावी यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शहरात एकूण १८१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे तीन दिवसीय सखोल प्रशिक्षण नगर परिषद गांधी विद्यालय येथे सुरू झाले आहे. या प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण आणि जिल्हा समन्वयक रवी पटेल यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून माहिती संकलनाचे काम विहित वेळेत आणि बिनचूक पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
क्षेत्र प्रशिक्षक संकेत कोचे आणि उप मुख्याधिकारी आकाश शहरे हे कर्मचाऱ्यांना ॲप चालविण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करत आहेत.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा जनगणना चार्ज अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी भंडारावासीयांना या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
जनगणना ही देशाच्या भविष्यातील नियोजनाचा आणि विकासाचा पाया असल्याने, नागरिकांनी १ मे ते १५ मे या काळात उपलब्ध असलेल्या ‘स्वयं-गणना’ सुविधेचा वापर करावा. तसेच, १६ मे पासून जेव्हा प्रगणक घरी येतील, तेव्हा त्यांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ३० एप्रिलपर्यंत शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची स्वयं-गणना पूर्ण करण्याचे उद्दिष्टही प्रशासनाने ठेवले आहे.

